संदीप आचार्य 
मुंबई व पुण्यासह राज्यात करोना रुग्णांसाठी पुरेशा रुग्णवाहिका नसताना खासगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूटमार सुरु आहे. याची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने एका आदेशाद्वारे राज्यातील खाजगी रुग्णवाहिका करोना रुग्णांसाठी आवश्यकतेनुसार ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रामुख्याने मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आदी शहरात व आता ग्रामीण भागात करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता खासगी रुग्णवाहिका चालकांनी याचा पुरेपूर फायदा घेत मोठ्या प्रमाणात लूटमार चालवली आहे. याबाबतच्या तक्रारी येऊनही मार्चपासून सरकार गप्प होते. एकीकडे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर मुंबईसह राज्याची प्रामुख्याने भिस्त होती. तथापि बरेचवेळा या रुग्णवाहिकांचे चालक व मदतनीस करोनाबाधित झाल्याने रुग्णवाहिका आहे मात्र चालक व मदतनीस नाही, अशी परिस्थिती झालेली दिसायची. यातून रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागल्यानंतर मुंबई महापालिकेने बेस्ट तसेच काही एसटी  बसेसचे रुग्णवाहिकेत परिवर्तन केले. मात्र तेही अपुरे ठरू लागले. त्यातच बहुतेक राजकीय पक्षांच्या रुग्णवाहिकाही करोना काळात गायब झाल्यानंतर १०८ क्रमांकाच्या व काही प्रमाणात खासगी रुग्णवाहिकांवरच रुग्णांना अवलंबून राहावे लागत आहे. याचा फायदा घेत किरकोळ अंतरासाठीही खासगी रुग्णवाहिका चालक रुग्णांकडून तीन हजारापासून ते १५ हजारापर्यंत रक्कम मागू लागले व हतबल रुग्णांना ही रक्कम देण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर त्याची दखल घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे राज्यातील खाजगी रुग्णवाहिका व वाहाने आवश्यकतेनुसार ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारले असता, “मुंबईसह राज्यात करोना रुग्ण तसेच गर्भवती महिलांना रुग्णवाहिका मिळण्यात अडचणी असून खाजगी रुग्णवाहिकांकडून मोठ्या प्रमाणात रुग्णांची लुटमार होत असल्यानेच डॉ. सुधाकर शिंदे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेतल्या जाणार आहेत. या रुग्णवाहिका ताब्यात घेताना प्रति किलोमीटर तसेच अन्य खर्चाचा विचार करून भाडे निश्चित केले जाईल. महापालिका क्षेत्रात आयुक्तांनी व अन्यत्र जिल्हाधिकाऱ्यांनी या रुग्णवाहिका त्यांच्या आवश्यकतेनुसार ताब्यात घ्यायच्या आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडे राज्यातील सर्व रुग्णवाहिकांची नोंदणी उपलब्ध असून त्यानुसार रुग्णवाहिका ताब्यात घेऊन करोना रुग्णांसाठी त्या वापरल्या जातील ” , असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

याशिवाय आवश्यकतेनुसार खासगी गाड्या ताब्यात घेऊन त्यात आवश्यकते बदल करून करोना रुग्णांसाठी वापरल्या जातील. या सर्व रुग्णवाहिकांसाठी दोन चालक व वाहक असतील. या सर्व रुग्णवाहिकांची संलग्नता १०८ क्रमांकाच्या यंत्रणे बरोबर केली जाणार आहे. जीपीएसच्या माध्यमातून या गाड्यांचे नियंत्रण जिल्हाधिकारी व पालिका स्तरावर केले जाईल, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. शासन, महापालिका तसेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकातील चालकांना काही वेळा करोनाची बाधा होत असल्याने तसेच पुरेशा रुग्णवाहिकांची वाढती आवश्यकता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात रोज सरासरी तीन ते साडेतीन हजार करोना रुग्ण सापडतात तर मुंबईत दररोज बाराशे ते पंधराशे रुग्ण आढळत असून बरे होणाऱ्या रुग्णांसाठीही रुग्णवाहिकेची लागणारी गरज यात लक्षात घेण्यात आली आहे.