विविध विषयांच्या नाटय़ाविष्कारांमुळे राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असून तिची महाअंतिम फेरी येत्या शनिवारी मुंबईत होईल. महाअंतिम फेरीत सर्वोत्तम आठ एकांकिकांमध्ये नाटय़संग्राम होईल.

‘सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘पितांबरी’ सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांच्या सहकार्याने रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ या स्पर्धेचा महाअंतिम फेरीचा क्षण समीप येऊन ठेपला आहे. हा भव्यदिव्य सोहळा येत्या शनिवारी माटुंगा येथील यशवंत नाटय़गृहात सकाळी १० पासून रंगणार आहे. या सोहळ्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील चतुरस्र अभिनेते मनोज वाजपेयी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आठ शहरांतून सर्वोत्तम ठरलेल्या आठ एकांकिकांमधील अंतिम झुंज रसिकांना महाअंतिम फेरीत अनुभवता येईल. या वेळी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार प्रेक्षकांना नाटय़गृहात प्रवेश दिला जाईल. प्रवेशिका त्याच दिवशी सकाळी साडेनऊ  वाजल्यापासून यशवंत नाटय़ मंदिरात मिळतील.

या स्पर्धेचे टॅलेन्ट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी ‘झी मराठी’ हे टेलिकास्ट पार्टनर आणि ‘एबीपी माझा’ न्यूज पार्टनर आहे.

लोकसत्ता लोकांकिकांचा हा नाटय़संग्राम एक महिन्यापासून सुरू आहे. आठ शहरांमधील महाविद्यालयीन विद्यार्थी नाटय़कर्मी नेटाने तालमी करून स्पर्धेच्या प्रत्येक फेरीतील आव्हानांवर मात करत महाअंतिम फेरीत दाखल झाले आहेत. आतापर्यंत मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांच्या विभागीय अंतिम फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

मुंबईतून सिद्धार्थ महाविद्यालय- आनंद भवनची ‘देव हरवला’, ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘चौकट’, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाची ‘आशा’, नाशिकची एचपीटी आर्ट्स आरवायके सायन्स महाविद्यालयाची ‘चलो सफर करे’, नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयाची ‘गटार’ आणि औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाची ‘मादी’ या एकांकिकांनी महाअंतिम फेरीत धडक मारली आहे.

रत्नागिरी आणि कोल्हापूर शहरांतील विभागीय अंतिम फेरी लवकरच पूर्ण होईल. या विभागातून सर्वोत्तम ठरणाऱ्या दोन एकांकिका मिळून आठ एकांकिकांमध्ये महानाटय़ संग्राम होणार आहे. आठ एकांकिकांमधून लोकांकिकाचा बहुमान कोण मिळवणार, याबद्दल नाटय़वर्तुळात आणि रसिकांमध्येही उत्सुकता आहे.

मनोज वाजपेयी यांची उपस्थिती

आठ शहरांमधून निवडलेल्या विविध विषयांवरील एकांकिका आणि त्यांच्या सादरीकरणातील वैविध्य प्रेक्षकांना महाअंतिम फेरीत अनुभवता येईल. तरूणपणी अभिनयाकडे जाणारी वाट धुंडाळत रंगमंच ते हिंदी चित्रपटसृष्टी असा प्रवास केलेले अभिनेते मनोज वाजपेयी यांचे विचार, अनुभव  ऐकण्याची संधी प्रेक्षकांना आणि नाटय़कर्मी विद्यार्थ्यांना मिळेल. त्यामुळेच लोकसत्ता लोकांकिकाचा महाअंतिम सोहळा अनोखा ठरणार आहे.

कुठे : यशवंत नाटयम् मंदिर, माटुंगा, मुंबई

कधी : शनिवारी, सकाळी १० पासून

प्रवेश: प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. प्रवेशिका कार्यक्रमस्थळी अर्धा तास आधी.