चुकीची माहिती दर्शवून आर्थिक फसवणूक; सायबर पोलिसांची कंपनीला खबरदारीची सूचना

जयेश शिरसाट, मुंबई</strong>

बसल्या जागी जगभरातील कोणत्याही गोष्टीची माहिती घेण्यासाठी ‘गुगल’सारख्या इंटरनेट सर्च इंजिन संकेतस्थळांचा सर्रास वापर करण्यात येतो. मात्र, हा ‘शोध’ अनेकांना फसवणुकीच्या वाटेवर घेऊन गेला आहे. वापरकर्त्यांना अचूक माहिती मिळवून देण्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध होणाऱ्या माहितीत बदल करण्याचे अधिकार गुगलने खुले ठेवल्याचा गैरफायदा ऑनलाइन घोटाळेबाज आणि भामटे घेत आहेत. गेल्या काही दिवसांत अशा चुकीच्या माहितीमुळे आर्थिक लुबाडणूक झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर राज्याच्या सायबर पोलिसांनी ‘गुगल’ला पत्र पाठवून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

गुगलच्या ‘सजेस्ट अ‍ॅन एडिट’ पर्यायाद्वारे भामटे प्रामुख्याने बॅंक ग्राहकांना लक्ष्य करत आहेत. महिन्याभरात मुंबई आणि ठाण्यातून अशा तक्रारी वाढल्याचे सायबर पोलिसांचे निरीक्षण आहे. दिल्लीसह देशाच्या प्रमुख शहरांमधूनही अशा तक्रारी पोलिसांपर्यंत येत आहेत.

गुगल शोध यंत्रावर काहीही शोधणे सहज शक्य आहे. जवळची बॅंक शाखा, मोबाइल किंवा वीज बिल भरणा केंद्र, विविध सेवा पुरवठादार कंपन्यांचे सव्‍‌र्हिस सेंटर, ग्राहक तक्रार केंद्र, हॉटेल या आणि अशा प्रत्येक शासकीय, खासगी आस्थापनांचा पत्ता, संपर्क क्रमांक, अचूक दिशा दर्शविणाऱ्या नकाशासाठी गुगलचा उपयोग होतो. हे तपशील अचूक असावे यासाठी गुगलने ‘सजेस्ट अ‍ॅन एडिट’ हा पर्याय दिला. त्याद्वारे तपशील बदलता येतो. भामटय़ांनी हा पर्याय वापरून बॅंकांसह शासकीय, खासगी आस्थापनांचा अधिकृत संपर्क क्रमांक खोडून स्वत:चा मोबाइल क्रमांक गुगलवर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे समोरून बोलणारी व्यक्ती बॅंक, ग्राहक सेवा केंद्रातील अधिकारी आहे या खात्रीने वापरकर्त्यांनी संवाद साधला. मागणीनुसार बॅंक खाते, डेबिट-क्रेडिट कार्डाचे तपशील पुरवले. त्याआधारे भामटय़ांनी संबंधित वापरकर्त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे काढले.

पवई पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ात अशाच प्रकारे सेवानिवृत्त वृद्धाच्या बॅंक खात्यातील लाख रुपये परस्पर काढण्यात आले. ई-वॉलेटचे ग्राहक सेवा केंद्र समजून साधलेल्या संवादानंतर दिल्लीतील महिलेच्या खात्यातून दीड लाख रुपये लंपास करण्यात आले.

‘बॅंक ऑफ इंडियाने गुगलवर बॅंक शाखांचे संपर्क क्रमांक, ईमेल आयडी भलतेच दिसतात. चुकीच्या तपशिलांमुळे फसवणूक घडल्याची तक्रार काही ग्राहकांनी केल्याची माहिती दिली होती,’ असे सायबर महाराष्ट्रचे पोलीस अधीक्षक बलसिंग राजपूत यांनी सांगितले. गेल्या महिन्या-दोन महिन्यांपासून अशा प्रकारे फसवणुकीच्या तक्रारी येत आहेत. गुगलने दिलेली माहिती शाश्वत, खात्रीशीर ही तमाम वापरकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे भामटय़ांनी गुगलवरल्याच माहितीत फेरफार सुरू केल्याचे निरीक्षण राजपूत नोंदवतात.

गुगलला सायबर पोलिसांचे पत्र

माहितीतील फेरफार, फसवणूक लक्षात येताच सायबर महाराष्ट्रने गुगलला पत्र धाडून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्याची माहिती राजपूत यांनी दिली. सजेस्ट अ‍ॅन एडिट पर्यायाद्वारे बदललेल्या तपशिलांची खातरजमा करण्याची व्यवस्था गुगलकडे नाही, असेही सायबर विभागाकडून सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल प्रवक्त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

फसवणूक कशी टाळाल?

’ बॅंक खात्यासह डेबिट-क्रेडिट कार्डाचे तपशील कोणालाही देऊ नयेत. ऑनलाइन व्यवहारांसाठी ओटीपीची (वन टाइम पासवर्ड) विचारणा होते. त्यामुळे मोबाइलवर ओटीपी क्रमांक दर्शवणारा लघुसंदेश आल्यास त्यातील तपशील कोणालाही देऊ नयेत.

’ गुगलद्वारे माहिती मिळवताना संबंधित आस्थापनेच्या अधिकृत संकेतस्थळाचा शोध घ्यावा. त्यावरून संपर्क क्रमांक किंवा अन्य तपशील घ्यावेत.