गर्दीने ओसंडून वाहणारे प्लॅटफॉर्म, गाडीत चढणाऱ्यांइतकीच उतरणाऱ्यांचीही गर्दी, प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर पुलावर चढण्यासाठीची चेंगराचेंगरी हे चित्र दादर स्थानकाचे आहे. मात्र येत्या दीड ते दोन वर्षांत दादर स्थानकावरील बहुतांश भार हलका होण्याची शक्यता आहे. दादरपुढच्या परळला टर्मिनस बांधण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून या टर्मिनसचा आराखडा बोर्डाकडून मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी लवकरच ‘परळ लोकल’चा मुहूर्त होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेवरील दादर स्थानकावर सध्या प्रचंड बोजा पडत आहे. दादर दोन्ही मार्गावर असल्याने लाखो लोक दादर स्थानकात उतरतात आणि तेवढेच चढतात. मध्य रेल्वेवर ३० उपनगरीय गाडय़ा दादरवरून सुटतात. त्यामुळे हे स्थानक दिवसाच्या कोणत्याही वेळी गजबजलेले असते. उपनगरीय सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा दादर येथून जादा गाडय़ा सोडणे कठीण आहे. त्यासाठी आणि दादर स्थानकावरील भार कमी करण्यासाठी हे नवे परळ टर्मिनस बांधण्याचा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे.

टर्मिनसची वैशिष्टय़े
० सध्याचा अप धीम्या मार्गाचा प्लॅटफॉर्म मुंबईच्या दिशेने वाढवून एल्फिन्स्टन पुलाला जोडणार.
० सध्याचा डाऊन धीमा मार्ग परळ येथे थांबवण्यात येणार आहे. याच मार्गावरून परळहून डाऊन मार्गावर गाडय़ा रवाना होतील. मात्र हा प्लॅटफॉर्म मुंबईच्या दिशेने वाढवून एल्फिन्स्टन पुलाला जोडणार.
० सध्या गाडय़ा सायिडगला घेण्यासाठी असलेल्या मार्गावरून मुंबईवरून येणाऱ्या धीम्या गाडय़ांची वाहतूक होणार.
० या गाडय़ांसाठी एक रुंद प्लॅटफॉर्म बांधणार.
० सध्या मुंबईच्या दिशेला असलेल्या फूटओव्हर ब्रिजला दोन्ही बाजूंनी चढण्या-उतरण्यासाठी जिना बनवणार.
० स्थानकात मधोमध एक पादचारी पूल बांधून पूर्वेला उतरण्यासाठी सोय करणार.

परळ टर्मिनस
प्रस्तावित खर्च :  ८० कोटी रुपये
जागा :  परळ स्थानक व एल्फिन्स्टन रोड यांच्या मध्ये