लॉकडाउनच्या काळात बंद असलेल्या गोष्टी हळूहळू उघडण्यात येत आहेत. मात्र, पुन्हा संसर्ग वाढू नये म्हणून याबाबत खबरदारी घेतली जात आहे. कारण जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे, हे उघडा ते उघडा असं सांगणाऱ्यांवर नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. सोशल मीडियातून लाईव्ह संभाषणादरम्यान, ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “करोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे अजूनही आपण शाळा उघडू शकलेलो नाही, याबाबत निर्णय घेतला आहे. पण अजूनही शाळा उघडू शकू की नाही हे प्रश्नांकित आहे. कारण जर शालेय विद्यार्थी आजारी पडले, त्यांचे शिक्षक आजारी पडले त्यांच्यामुळे विद्यार्थीही आजारी पडतील. त्यामुळे काळजी घेत घेत आपण पुढे जात आहोत. बाकीच्यांच ठीक आहे, पण मला यात राजकारण आणायचं नाही. कारण ते म्हणताहेत हे उघडा ते उघडा पण याची जबाबदारी घेता का?” असा सावलही यावेळी मुख्यमंत्री विरोधकांना केला.

“जनतेची जेवढी जबाबदारी सरकारच्या माध्यमातून माझ्यावर आहे. तेवढी हे उघडा ते उघडा म्हणणाऱ्यांवरती नाही. मी जसं आपल्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी प्रार्थनागृह उघडले पण ती उघडली म्हणजे तिथं गर्दी करु नका,” असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं.