भाजपने जर त्यांचा मार्ग निवडला असेल तर शिवसेनेसमोर देखील पर्याय खुले आहेत. आम्ही आमचा मार्ग निवडू, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले. वाढती महागाई, सत्तेत असूनही शासकीय कामातील अडथळे आणि कामांचा आढावा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना भवनात सेना आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबत बोलताना उद्धव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा धागा पकडून भाजपने जर त्यांचा मार्ग निवडला असेल तर आम्हीही आमच्या मार्गाने जाऊ, असे सांगितले. भाजपला शिवसेनेसोबत यायचे नाही हे दानवेंच्या विधानातून स्पष्ट झाले आहे. भाजपने जर त्यांचा महापौर पालिकेत बसविण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्ही देखील आमच्या मार्गाने जाऊ, आमच्यासमोरही पर्याय खुले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तूरडाळीच्या साठेबाजांवर कारवाई वगैरे ठीक आहे, पण दिवाळी काही दिवसांवर आली असूनही तूरडाळीचे भाव अद्याप कमी झालेले नाहीत. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेच्या आमदारांना डाळीचे भाव नियंत्रणात आणण्याबाबत निवेदन करण्यात आली होती, असे उद्धव यांनी सांगितले. ते निवेदन मान्य करून मुख्यमंत्र्यांनी तूरडाळीचे भाव १२० प्रतिकिलो इतके निश्चित करण्यात आले असून त्याहून अधिक दराने डाळ विक्री होत झाल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरे यांनी आभार व्यक्त केले. तर, आगामी काळात एकत्रितरित्या गुण्यागोविंदाने काम करू, अशी मुख्यमंत्र्यांनी इच्छा व्यक्त केली होती. राज्याच्या कल्याणासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्नशील राहील आणि वेळोवेळी कामांचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे केला जाईल. तसेच शिवसेनेच्या मतदार संघांतील कामांचाही पाठपुरावा फडणवीस यांची भेट घेऊन करणार असल्याचे त्यांना सांगितले.