संतोष प्रधान

दिल्लीच्या सत्तेच्या वर्तुळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अन्य राज्यांच्या तुलनेत कमी असल्याची चर्चा नेहमी होत असते. मात्र नोकरशाहीमध्ये राज्याच्या सेवेतील तिसऱ्या अधिकाऱ्याला केंद्र सरकारमध्ये सचिवपदी संधी मिळाली आहे.

महाराष्ट्र केडरमधील १९८६ च्या तुकडीतील छत्रपती शिवाजी यांची दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारमध्ये प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक गाऱ्हाणे विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी मनिलास्थित एशियन डेव्हलपमेंट बँकेचे कार्यकारी संचालकपद शिवाजी यांनी भूषविले. या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर शिवाजी हे केंद्रात परतले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदासाठी शिवाजी यांच्या नावाची चर्चा होती. ‘सिडबी’ बँकेचे अध्यक्षपद, राज्य सरकारमध्ये वित्त आणि उद्योग खात्यात सचिवपदे, जागतिक बॅँक अशा विविध पदांवर मूळचे बिहारचे असलेल्या शिवाजी यांनी काम केले आहे.

केंद्रात वित्त खात्यात महसूल या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विभागाच्या सचिवपदी अजयभूषण पांडे तर संरक्षण विभागात माजी सैनिकांचे कल्याण या विभागाच्या सचिवपदी संजीवनी कुट्टी हे दोन राज्याच्या सेवेतील अधिकारी कार्यरत आहेत. शिवाजी हे तिसरे सचिवपदी नेमले गेलेले अधिकारी आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल हे मंत्री तर रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे हे राज्यमंत्री आहेत.