भारतीय सिनेसृष्टीत महत्वाचं योगदानं देणाऱ्या कपूर घराण्यातील एक बिनधास्त व्यक्ती आणि बॉलिवूडचं एक एव्हरग्रीन व्यक्तीमत्व ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. विविध चित्रपटांमध्ये दर्जेदार भुमिका साकारणाऱ्या ऋषी कपूर यांचा असा घडला सिनेसृष्टीतला प्रवास….

ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी दक्षिण मुंबईत झाला. ‘चिंटू’ या टोपण नावानेही ते ओळखले जात. बॉलिवूडचे शोमॅन दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर यांचे ते दुसरे पुत्र. ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्यासोबत त्यांनी मुंबईतील कॅम्पेन स्कूल कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण घेतलं.

ऋषी कपूर यांनी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं ते त्यांचे वडील राज कपूर दिग्दर्शित आणि अभिनित मेरा नाम जोकर (१९७०) या सिनेमातून. या सिनेमात त्यांनी त्यांच्या वडिलांची लहानपणीची भुमिका साकारली होती. त्यानंतर ते पहिल्यांदा डिंपल कपाडियासोबत बॉबी (१९७३) या सिनेमात प्रमुख भुमिकेत झळकले. त्या काळात तरुणांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला होता. त्यामुळे पहिल्याच सिनेमानंतर ऋषी कपूर बॉलिवूडमध्ये ओळखले जाऊ लागले.

त्यानंतर नीतू सिंग आणि ऋषी कपूर या जोडीने १९७४ ते १९८१ या काळात अनेक चित्रपट केले. मात्र, या जोडीचे केवळ मल्टिस्टारर चित्रपटच यशस्वी ठरले. त्यांचे जहरिला इन्सान, जिंदा दिल, दुसरा आदमी, अंजाने मे, झूठा कही का, धन दौलत हे या जोडीचे चित्रपट फ्लॉप ठरले होते. तर खेल खेल मे, कभी कभी, अमर-अकबर-अॅन्थोनी, पती-पत्नी और वो, दुनिया मेरी जेब मे हे या जोडीचे मल्टिस्टारर सिनेमे हीट ठरले. तर रफू चक्कर हाच या जोडीचा सोलो हिट ठरला.

ऋषी कपूर यांनी १९७४ ते १९९७ या काळात ५१ सोलो लीड रोल केले. यांपैकी ४० सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. तर केवळ ११ सिनेमे हिट ठरले. यांमध्ये बॉबी, लैला मजनू, रफू चक्कर, सरगम, कर्ज, प्रेम रोग, नगिना, हनिमून, बंजारण, हिना आणि बोल राधा बोल या चित्रपटांचा समावेश होता.

नव्वदच्या दशकात त्यांचा सेकन्ड हिरो रोल असलेले दिवाना, दामिनी आणि ईना-मिना-डिका हे चित्रपट हिट ठरले होते. १९९९ मध्ये त्यांनी ‘आ अब लौट चले’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. त्यानंतर २००० च्या काळात ऋषी कपूर यांनी सहाय्यक अभिनेत्याच्या भुमिका करायला सुरुवात केली. यामध्ये ये है जलवा, हम तुम, फना, नमस्ते लंडन, लव्ह आज कल, पटियाला हाऊस या सिनेमांचा समावेश आहे. त्यांनी डोन्ट स्टॉप ड्रिंमिंग आणि सांबर सालसा या ब्रिटिश चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. २०१० मध्ये आलेल्या दो दुनी चार या सिनेमात त्यांनी अभिनेत्री पत्नी नीतू सिंग यांच्यासोबत पुन्हा काम केले. त्याचबरोबर चिंटू जी या सिनेमात त्यांनी त्यांचीच भुमिका साकारली होती. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी अग्निपथ या चित्रपटात खलनायकाची भुमिका साकारली. त्यानंतर मल्टिस्टारर चित्रपट हाऊसफुल्ल २ मध्ये त्यांनी आपले मोठे बंधू रणधीर कपूर यांच्यासोबत पहिल्यांदाच काम केले.