कोकणासाठी तीन हजार एसटी बस; विलगीकरण कालावधी दहा दिवसांवर

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांपुढील प्रवासविघ्न अखेर दूर झाले आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी तीन हजार एसटी बस सोडण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी मंगळवारी जाहीर केले. १२ ऑगस्टपर्यंत कोकणात जाणाऱ्यांसाठी १० दिवसांचा विलगीकरण कालावधी असून, त्यानंतर जाणाऱ्यांना मात्र करोना चाचणी बंधनकारक आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पुणे परिसरातून लाखो गणेशभक्त कोकणातील गावी जातात. यंदा करोनामुळे कोकण प्रवासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. एसटी, रेल्वे सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यासाठी महिनाभरापासून प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठका सुरू होत्या. कोकणातील अनेक गावांनी मुंबईहून येणाऱ्यांसाठी विलगीकरणाची अट ठेवली. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब व गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोकणात जाण्यासाठीचे धोरण, एसटी व्यवस्था आणि नियमावली जाहीर केली.

एसटी महामंडळ बुधवारपासून गाडय़ा उपलब्ध करून देणार आहे. एका बसमध्ये २२ प्रवाशांची सोय असेल. त्यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २२ जणांनी एकत्र नोंदणी केल्यास थेट कोकणातील त्यांच्या गावी पोहोचविण्याची व्यवस्था केली जाईल, असे परब यांनी सांगितले.

दरवर्षी गणपतीसाठी कोकणात साधारणपणे २२०० एसटी बस सोडल्या जातात. यंदा त्यात वाढ करून तीन हजार एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या गाडय़ा तिकडेच थांबतील आणि गणेशोत्सव संपल्यानंतर प्रवाशांना पुन्हा घेऊन येतील. त्यासाठी गणेशभक्तांनी परतीच्या प्रवासाचेही आरक्षण करावे, असे परब यांनी सांगितले.

कोकणात जाण्यासाठी मोठा प्रवास करावा लागत असल्याने पूर्वी भोजनासाठी एसटी थांबत असे. मात्र, करोनामुळे आता भोजनाचा थांबा घेतला जाणार नाही. केवळ पाच-दहा मिनिटांचे दोन थांबे असतील. प्रवाशांनी डबे घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन परब यांनी केले.

ई-पास

एसटीने प्रवास करणाऱ्यांना कोणत्याही ई-पासची आवश्यकता नाही. मात्र खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पास बंधनकारक असेल.

करोना चाचणी

१२ ऑगस्टपर्यंत कोकणात जाणाऱ्यांसाठी विलगीकरणाचा कालावधी चार दिवसांनी कमी करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर जाणाऱ्यांनी प्रवासाच्या ४८ तास आधी करोना चाचणी करणे बंधनकारक आहे. संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच त्यांना प्रवास करता येईल.

प्रवासभाडय़ाचे नियमन

खासगी प्रवासी वाहतूकदारांना एसटी भाडय़ाच्या दीडपट भाडे आकारण्याची मुभा आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी गाडय़ांवर कारवाई करण्याचा इशारा अनिल परब यांनी दिला.

एसटीची नोंदणी सुरू

एसटी प्रवासासाठी संके तस्थळावरील नोंदणी-आरक्षण मंगळवारी सायंकाळीच सुरू झाले. प्रवाशांना संके तस्थळावरून किं वा एसटीच्या अ‍ॅपवरून नोंदणी करता येईल.

वरातीमागून घोडे : भाजप

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी परिवहनमंत्र्यांनी मंगळवारी जाहीर केलेला निर्णय म्हणजे वरातीमागून घोडे असा प्रकार असल्याची टीका भाजप नेते आमदार आशीष शेलार यांनी केली आहे. ई-पास मिळण्यात अडचणी आहेत. पासधारकांच्या रांगा कशेडी घाट आणि खारेपाटणमध्ये लागत आहेत. अन्न, पाण्याशिवाय प्रवाशांचे हाल सुरू आहेत. कोकणात जाणाऱ्यांसाठी करोना चाचण्या मोफत कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.