वांद्रे-वर्सोवा पूल, ठाणे उन्नत मार्गास मंजुरी; खासगीकरणाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा

टोलसंस्कृतीला आळा घालण्याकरिता ५५ नाक्यांवरील टोल बंद करून सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घेतली खरी, पण आर्थिक आघाडीवर चित्र निराशाजनक असल्यानेच मुंबई व ठाण्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प खासगीकरणाच्या माध्यमातून राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भविष्यात २०३५ पर्यंत टोल कायम राहणार आहे. वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू, वाशी खाडीवर तिसरा पूल, ठाण्यातील घोडबंदर मार्गावर उन्नत मार्ग, भिवंडी-कल्याण रस्त्याचे रुंदीकरण याबरोबरच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामांना पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली.

वरळी-वांद्रे सागरी मार्गाचे वर्सोव्यापर्यंत विस्तारीकरण करण्याच्या कामाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत विकास सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मागे आघाडी सरकारच्या काळात याच पुलाला मान्यता देण्यात आली होती, पण काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत वादात काम प्रत्यक्ष सुरू झाले नव्हते. सागरी मार्गाबरोबरच वर्सोव्यापर्यंत सागरी पुलाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नक्की काय होणार?

नवी मुंबईतून मुंबईत प्रवेश करताना होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तिसऱ्या पुलाच्या कामामुळे २०३९ पर्यंत वाशी पुलावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून टोल वसूल केला जाईल.

ठाण्यात घोडबंदर मार्गावर ६६७.३७ कोटी रुपये खर्चाच्या ४.१५ किमी लांबीच्या उन्नत मार्गास मान्यता देण्यात आली असून घोडबंदर मार्गावर सध्या सुरू असलेल्या टोलवसुलीस १० वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या टोल नाक्यावरून हलक्या वाहनांना वगळण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी- कल्याणदरम्यानची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सध्याच्या चारपदरी रस्त्याचे सहापदरी रस्त्यांत रूपांतर करण्यात येणार आहे. शिवाय रेल्वे उड्डाणपूलही बांधण्यात येणार असून ३८९ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम या वर्षी सुरू केले जाणार आहे.

पुणे द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाच्या क्षमतावाढीचा निर्णय घेतला होता. खोपोली एक्झिट ते कुसगाव हा साडेसहा किमीचा ‘केबल स्टेड’ पूल बांधण्यात येणार आहे. तसेच खालापूर ते खोपोलीदरम्यान सध्याच्या सहापदरी मार्गाचे रुंदीकरण करून आठपदरी करण्यात येणार आहे. घाटात दोन बोगदे तसेच काही ठिकाणी पूलही बांधण्यात येणार आहेत. खोपोली ते सिंहगड इन्स्टिटय़ूट या मार्गावर सुधारणा करण्यात येणार आहेत. या कामांमुळे प्रवासाचे अंतर १९ किमीवरून १३.३ पर्यंत म्हणजेच सहा किमीने कमी होणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासात अध्र्या तासाची बचत होणार असून वाहतूक कोंडीही कमी होणार असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. येत्या चार वर्षांत हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. ३१ जुलै २०३५ पर्यंत या मार्गावर टोलची वसुली सुरू राहणार आहे.