४२७५ घरांसाठी १ लाख ३४ हजार अर्जू

म्हाडाच्या कोकण विभागाकडून अर्ज काढण्यात आलेल्या ठाणे, मीरा रोड, विरार व वेंगुर्ला येथील ४ हजार २७५ घरांची सोडत उद्या, बुधवारी काढण्यात येणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा नाटय़गृहात सकाळी १० वाजता ही सोडत काढली जाईल. या घरांसाठी १ लाख ३४ हजार १२४ अर्ज आले आहेत.

या वेळच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ठाण्यातील बाळकुम येथे १९, तर मीरा रोड येथे ३१०, अल्प उत्पन्न गटासाठी विरार बोळिंज येथे २४६५, कावेसर ठाणे येथे १६४, मध्यम उत्पन्न गटासाठी विरार बोळिंज येथे १२९०, वेंगुर्ला येथे २१ आणि उच्च उत्पन्न गटासाठी वेंगुर्ला येथे ६ अशा ४,२७५ घरांचा समावेश आहे. या वेळी मीरा रोड तसेच ठाण्यातील कावेसर येथील घरांसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.

सोडतीचा निकाल सभागृहात किंवा सभागृहाबाहेर लावलेल्या पडद्यावर पाहता येईल. सभागृहातील प्रवेशिका बुधवारी सकाळी सात ते नऊ दरम्यान प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर दिल्या जातील. म्हाडाच्या संकेतस्थळावरही थेट प्रक्षेपण केले जाणार असून संध्याकाळी सहा वाजल्यानंतर संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाईल.