News Flash

सह्याद्रीतील किल्ल्यांवर पर्यटकांची ‘बेभान’ गर्दी

अपघातप्रवण परिसरातही सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

(संग्रहित छायाचित्र)

सुहास जोशी

मोसमी पावसाने अद्याप हजेरी लावली नसली तरी, पावसाळय़ात सह्याद्रीच्या डोंगररांगांतील किल्ल्यांवर होणारी गिरीपर्यटकांची अनियंत्रित गर्दी चिंतेचा विषय ठरू लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ल्यावर रविवारी पर्यटकांची एवढी गर्दी झाली होती की, या ठिकाणी चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होती. असेच चित्र सह्याद्रीच्या डोंगररांगांतील सर्वच किल्ल्यांच्या परिसरात दर शनिवारी-रविवारी दिसू लागले आहे.

हरिहर किल्ल्यावरील गर्दीची छायाचित्रे समाजमाध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर गिरीपर्यटकांच्या ‘बेभान’ गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकावेळी कोणत्याही किल्ल्यावर किती गिरीपर्यटकांची गर्दी सामावून घेता येऊ शकते त्यानुसार गिरीपर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा लवकरच कार्यरत व्हावी अशी मागणी केली जात आहे.

नाशिक जिल्ह्य़ातील हरिहर, रत्नगड, हरिश्चंद्रगड, पुणे जिल्ह्य़ातील राजगड, लोहगड, रायगड जिल्ह्य़ातील कलावंतीण सुळका, पेबचा किल्ला, ठाणे जिल्ह्य़ातील गोरखगड ही ठिकाणे सध्या हौशी गिरीपर्यटकांची आवडीची ठिकाणे होती. गेल्या वर्षी हरिहर किल्ल्यावरील गर्दीचे प्रमाण प्रचंड वाढल्यानंतर नाशिक येथील वैनतेय गिर्यारोहण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्य़ाधिकाऱ्यांची भेट घेऊन स्थानिक वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नियंत्रण आणण्याची मागणी केली होती. ‘हरिहर किल्ल्याची वाट अरुंद असून, वरील पठारी प्रदेशदेखील मर्यादितच आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात किल्ल्यावर जाण्यास बंदी करावी, तसेच शनिवार-रविवारी गर्दीवर संख्येतच लोकांना किल्ल्यावर सोडावे. पायऱ्यांना शिडय़ा आणि किल्ल्यावर रेलिंग लावण्याऐवजी गडावर स्थानिकांची नेमणूक करावी, तो खर्च स्थानिक वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रवेश शुल्क आकारून भागवावा.’ अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्याचे संस्थेचे गिरीश टकले यांनी सांगितले. मात्र, यंदाही परिस्थिती तशीच असल्याने त्यांची संस्था पुन्हा जिल्ह्य़ाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

गर्दी होणाऱ्या किल्ल्यांपैकी ज्यांचा समावेश राज्य संरक्षित स्मारकांमध्ये होतो अशा ठिकाणी गर्दी प्रमाणाबाहेर वाढत असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने नियमावली करण्याची तयारी असल्याचे, राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले. पुरातत्त्व खात्याकडे मनुष्यबळ मर्यादित असल्यामुळे स्थानिक वनव्यवस्थापन समितीचा आधार घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात गिरीपर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे यापूर्वी सिंहगड, लोहगड अशा ठिकाणी अपघाताचे अनेक प्रसंग घडले आहेत. पनवेलजवळील कलावंतीण सुळक्यावरदेखील गर्दीचे प्रमाण वाढतेच आहेत. अरुंद अशी पायवाट, पायऱ्यांच्या आकर्षणापायी गिरिपर्यटकांच्या संख्येत वाढ होत असते. त्यावर स्थानिकांनी काही प्रमाणात त्यावर नियंत्रण आणायचा प्रयत्न केला.  कलावंतीणला जाण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाते. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार मागील वर्षी एकाच वेळी तब्बल १२०० जणांची गर्दी कलावंतीण सुळक्यावर झाली होती.

हरिहर किल्ल्यावरील वाढत्या गर्दीबाबत आपत्ती निवारणच्या अंतर्गत सर्व विभागांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. वनखात्यालादेखील सूचना देण्यात आल्या आहेत. वाढत्या गर्दीबाबत स्थानिक यंत्रणा आणि स्थानिक यांच्या मदतीने या परिस्थितीवर तोडगा काढण्यात येईल. कायदेशीर प्रक्रियेचादेखील विचार करण्यात येत आहे.

-सुरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 1:43 am

Web Title: tourists crowds on sahyadri fort trekking abn 97
Next Stories
1 मंत्र्यांच्या बंगल्यांचा मालमत्ता कर जमा
2 मुलुंडमध्ये तीन कुष्ठरुग्ण
3 मुंबईतील पुलांसाठी नवीन मानके
Just Now!
X