सीसीटीव्हीच्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची नजर; सिग्नलवरील थांबारेषा ओलांडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी शहरात जागोजागी बसवलेल्या सीसीटीव्हींच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना ‘टिपून’ थेट भ्रमणध्वनीवर दंडात्मक कारवाईची पावती पाठवण्याच्या वाहतूक पोलिसांच्या उपक्रमातून बेशिस्त वाहनचालकांची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच तब्बल साडेचार हजार वाहनचालकांना दंडात्मक कारवाईचे चालान रवाना झाले आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरभरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांना चालान देण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईला फक्त चारच दिवस उलटले असून तेवढय़ा कालावधीतही साडेचार हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबईच्या चौकाचौकांमध्ये बसवलेल्या ४४१७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने मुंबई वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही चालान देण्याची योजना सुरू केली आहे. या सीसीटीव्ही चालान पद्धतीमुळे वाहनचालक व वाहतूक पोलीस यांच्यात होणारी वादावादी, वाहतूक पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना आणि भ्रष्टाचार या सगळ्यांना आळा बसणार आहे. विशेष म्हणजे मुंबईतील पहिली सीसीटीव्ही चालान मिळवणाऱ्या तीनही वाहनांच्या चालकांनी लाल सिग्नल असताना झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करण्याचा गुन्हा केल्याचे वाहतूक पोलिसांतील सूत्रांनी स्पष्ट केले.

४ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या योजनेद्वारे आतापर्यंत साडेचार ते पाच हजारांहून अधिक वाहनमालकांना चालान पाठवण्यात आले आहे. नियमभंग करणारी गाडी ज्याच्या नावावर नोंदवली असेल, त्याच्या मोबाइल क्रमांकावर हे चालान पाठवले जाणार आहे. त्यात नियमभंग करताना गाडीचे छायाचित्र, गाडीचा नंबर स्पष्टपणे दाखवणारे छायाचित्र, नियमभंगाचा प्रकार आणि दंडाची रक्कम याची माहिती असेल. त्याचप्रमाणे दंड कुठे भरायचा याचीही लिंक असेल. आतापर्यंत लागू झालेल्या चालानपैकी ९० टक्के चालान सिग्नल लाल असतानाही ‘स्टॉप लाइन’पुढे गाडय़ा दामटून झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या करणाऱ्या वाहनांच्या मालकांना पाठवण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

आतापर्यंत झेब्रा क्रॉसिंगवर गाडय़ा उभ्या करणे, नो पार्किंमध्ये गाडय़ा लावणे, हेल्मेट न घालणे आदी गोष्टी निर्धास्तपणे करणाऱ्या मुंबईकरांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या नजरेतूनही मुंबईकरांनी केलेले हे नियमभंग लपणार नाहीत. त्यामुळे मुंबईकरांनी नियमांचे पालन करूनच वाहने चालवावीत. त्यामुळे त्यांचा आणि इतरांचाही जीव सुखरूप राहणार आहे.

– मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त (वाहतूक शाखा)