गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसाच्या तडाख्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून रस्त्यांवरील वाहतुकीला कासवगती प्राप्त झाली आहे. त्याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडू लागला असून केवळ वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच नव्हे, तर पादचाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेले काही दिवस मुंबईमध्ये पाऊस कोसळत आहे. अधूनमधून अल्प विश्रांती घेऊन पावसाचे बरसणे सुरूच आहे. त्यामुळे मुंबईतील लहान-मोठय़ा रस्त्यांवरील खड्डय़ांची संख्या वाढू लागली आहे. तर पदपथांवर बसविलेले पेव्हर ब्लॉकही खिलखिळे होऊ लागले असून त्याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत अनेक नोकरदारांना कार्यालयाची वाट धरावी लागली. वाहतुकीला कासवगती आल्यामुळे अनेकांना कार्यालय गाठण्यास विलंब झाला. उपनगरांमधून दक्षिण मुंबईत येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची रांग लागली होती. रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना वाहने हाकताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. खड्डय़ांमधील डांबरमिश्रित खडी रस्त्यांवर पसरली असून ती दुचाकीस्वारांच्या अपघाताना कारणीभूत ठरत आहे. संध्याकाळीही दक्षिण मुंबईमधून उपनगरांच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची रांग लागली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हुतात्मा चौक, हुतात्मा चौक ते चर्चगेट रेल्वे स्थानक, नरिमन पॉइंट आदी भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पश्चिम द्रुतगती महामार्गावरही वाहनांची लांबलचक रांग लागली होती. तासन्तास वाहनामध्ये बसून प्रवाशी हैराण झाले होते. सायंकाळी आपल्या वाहनाने उपनगरांची  वाट धरणाऱ्या अनेक मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे गचके खात प्रवास करावा लागत होता.

वाहतूूक कोंडीत ‘बेस्ट’च्या अनेक बसगाडय़ा अडकून पडल्या होत्या. परिणामी, बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी वाढत होती. बसगाडय़ा विलंबाने आगारात पोहोचत होत्या. मात्र प्रवाशांचे हाल होवूू नये यासाठी आगारात येणाऱ्या बसगाडय़ा तातडीने प्रवाशांच्या सेवेसाठी धाडण्यात येत होत्या. बसगाडय़ांची प्रतीक्षा करून कंटाळलेले प्रवाशी टॅक्सी, रिक्षाचा पर्याय निवडून मार्गस्थ होत होते.