भिवंडीजवळच्या पाली भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील एका १८ वर्षीय युवतीने आंतरजातीय विवाह केल्याने संतापलेल्या सासरच्या मंडळींनी तिचे मुंडन करून तिला लाकडी ओंडक्याला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्रमजीवी संघटनेच्या मदतीने या युवतीने पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार पोलिसांनी दीर, सासू-सासरे अशा तिघांना अटक केली आहे.
१८ वर्षीय आदिवासी युवतीचे मैंदे येथील योगेश पाटील या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यांनी २८ मे रोजी विवाह केला, मात्र या विवाहास योगेशच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे ते पाली गावी राहात होते. संतापलेल्या पाटील कुटुंबीयांनी तेथ ेसुनेला मारहाण करून योगेशला घरी नेले. मधल्या काळात तिने पतीची भेट घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.  गेल्या शुक्रवारी पाटील कुटुंबीयांनी या युवतीच्या डोक्यावरील केस कापून मुंडण केले. त्यानंतर पडघा पोलिसांनी गुन्हा दाखल करून सासरा मधुकर पाटील, सासू मालती आणि दीर रोहिदास या तिघांना अटक केली आहे.