सौंदर्य हा शाप आहे. साठच्या दशकातील एखाद्या कादंबरीत हमखास असलेले हे वाक्य कासच्या पठाराला अगदी लागू होते. कास पठाराची अनोखी भौगोलिक रचना व त्यामुळे या पठारावर उमलणाऱ्या फुलांच्या राशी यांची माहिती कर्णोपकर्णी पसरली आणि गेल्या दहा वर्षांत कासच्या पठाराचा पावसाळ्यातील चेहरामोहराच बदलला. माळरानावर सहज फुलणाऱ्या फुलांना काटेरी कुंपणात बंदिस्त करूनही पर्यटकांच्या लोंढय़ांना आवर घालणे कमी पडू लागले. परिस्थिती एवढी चिघळली की कधीकाळी कासची महती गाणाऱ्या पर्यावरणप्रेमींनी त्यामुळेच या वर्षी कासला जाऊ नका अशी मोहीम सुरू केली.

या सर्व पाश्र्वभूमीवर कासला जाऊ नये असेच वाटत होते. कासवर उमललेल्या फुलांच्या बातम्या, छायाचित्रे ऑगस्टच्या मध्यापासूनच येऊ लागली होती. मात्र त्याच वेळी कास पठारावर होत असलेल्या पर्यटकांच्या तुडुंब गर्दीत आणि त्यामुळे होत असलेल्या पर्यावरणाच्या नासाडीत आपली भर नको, असेही जाणवत होते. अखेर कासवर आठ वर्षांनी उमललेल्या कार्वीचे मळे पाहण्याच्या उत्सुकतेने कासला न जाण्याच्या विचारावर मात केली आणि पुढची आठ वष्रे थांबण्यापेक्षा कास पाहण्याचा विचार केला.

कार्वीला आठ वर्षांनी फुले येतात. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आठ वर्षांपूर्वी कार्वीच्या गुलाबी, जांभळ्या फुलांचे पहिले दर्शन झाले होते, तेव्हाच आठ वर्षांनंतरचा बहर पाहण्याची इच्छा झाली होती. पावसाळ्यात पाने आणि त्यानंतर आठ महिने खुंट म्हणूनच उभ्या राहिलेल्या या झुडपाला आठ वर्षांनी असा काही बहर येतो की सात वर्षांच्या तपस्येचे सार्थक झाल्यासारखे वाटते. कासच्या पठारावर कार्वी उमलण्यास सुरुवात झाल्याचे समजल्यावर गेल्या आठवडय़ात कासच्या पठारावर पोहोचलो. वाटेतच कार्वीच्या झुडपांना लगडलेली फुले दिसू लागली तेव्हा गाडी थांबवून फुले काढण्याचा मोहही झाला. कदाचित वर पठारावरचा बहर ओसरला असेल तर.. किमान ही फुले तरी पाहून घेऊ.. वर पोहोचेपर्यंत दुपारचे तीन वाजले होते आणि तेव्हा पावसाने अंधार केला होता. या वेळी पाऊस येऊ नये असे कितीही वाटत असले तरी पठारावर पाय ठेवण्याच्या सुमारास पावसाच्या सपासप सरी सुरू झाल्या आणि ढग खाली उतरल्याने पन्नास फुटांवरचेही काही दिसेना. त्यामुळे मुकाटपणे पुन्हा गाडीत येऊन बसलो.

दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कासच्या पठारावर जाण्याची संधी मिळाली, पावसाची रिपरिप सुरूच होती, धुके विरळ झाले असले तरी निसरडी झालेली जमीन आणि कॅमेरा सांभाळत चालण्याची कसरत सुरू होती. या सगळ्या कसरतीत टोपली कार्वीचे पायाखाली फुललेले मळे दिसत होते. दीड-दोन फुटांच्या झुडपांनी अख्खे पठार व्यापले होते. हिरव्या गालिच्यावर पसरलेली गुलाबी, जांभळ्या रंगांची फुले व त्यावर पडलेले दवबिंदू या स्वप्नवत चित्रात अडसर ठरत होता तो माणसांच्या कलकलाटाचा. सहलीच्या मूडमध्ये आलेल्यांनी पठाराच्या प्रत्येक भागात पावलाचे ठसे उमटवले होते. या गर्दीत आम्हीही होतो.

कार्वीसोबतच आणखी एका फुलाने सध्या कास पठारावर मुक्काम जमवला आहे. तो म्हणजे मिकी माऊस. मिकी माऊसच्या चेहऱ्यासारखी दिसणारी सोनपिवळ्या रंगाची ही इटुकली फुले कार्वीच्या जांभळ्या रंगाला शोभूनच दिसत होती. तेरडय़ाचा बहर ओसरला असला तरी अधूनमधून तेरडय़ाची फुलेही डोकावत होती. काळी निसुर्डी, भारंगी, सोनकी, वेलवेट अशा अनेक फुलांचे ताटवे नव्हते, मात्र त्यांची उपस्थिती जाणवण्याइतपत होती. पावसाची रिपरिप सुरूच असल्याने मात्र फिरण्यावर बंधने येत होती. यातून बाहेर पडत रस्त्याने वाहनतळापर्यंत निघालो तेव्हा डांबरी रस्ता लाल मातीने माखला होता. दोन्ही बाजूंनी येणारी वाहने आणि गर्दी यामुळे चुकीच्या दिवशी इथे पोहोचल्याचे पुन्हा जाणवले. पण पन्नासेक मीटरनंतर ही निराशा कुठल्या कुठे पळाली. दोन्ही बाजूंना कार्वीची मोठी झुडपे आणि त्याला लगडलेल्या असंख्य कळ्या व फुले यांचा सोहळा पाहताना अशरश: किती आणि कुठे पाहू अशी अवस्था झाली होती. दहा ते बारा फुटांपर्यंत पूर्ण वाढ झालेल्या कार्वीला गेल्या सात वर्षांत एकही फूल फुलले नव्हते, यावर विश्वास ठेवणे कठीण जावे, अशी स्थिती होती. जिथे नजर जावी तिथे फक्त कार्वी. अगदी कार्वीच्या मुळाकडेही फुलांचाच खच.

गेल्या वर्षी कासवर काही ठिकाणी कार्वी फुलली होती. मात्र तरीही या वर्षीचा बहर औरच होता. कासच्या पठारावर जाऊन गर्दीत भर घातली ही चुटपुट होती, मात्र कार्वीदर्शनाने त्यावर मात केली.

प्राजक्ता कासले -prajakta.kasale@expressindia.com