दोन दिवसांच्या अविरत पावसानंतर मुंबईकरांची ‘वाट’
मुंबईमध्ये शनिवारपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्डय़ांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पदोपदी पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावला असून कायम घडय़ाळाच्या काटय़ावर धावणाऱ्या मुंबईकरांचे वेळापत्रक पार कोलमडले आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यामध्ये घाईघाईने रस्तेबांधणीचे काम पूर्ण केलेले रस्तेही खड्डय़ात गेले आहेत. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना पिटाळले आहे. मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे खड्डे बुजवता येत नसल्याची तक्रार अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने मुंबईकरांची ‘वीकेण्ड’लाच कोंडी केली; परंतु सोमवारी पावसाचा जोर कमी असतानाही मुंबईकरांची वाट खड्डय़ांनी अडवली. अनेक रस्त्यांवर अध्र्या फुटापेक्षा खोल मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डय़ांमधून हेंदकळत जाणारी चारचाकी वाहने आणि खड्डे चुकवत निघालेले दुचाकीस्वार यांच्यासाठी रस्त्यातून जाणे दिव्य ठरू लागले आहे. पावसाची संततधार कोसळत असल्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात अडथळे येत आहेत. ओल्या रस्त्यांवर डांबरमिश्रित खडी टाकल्यास ती पुन्हा उखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका अधिकारी पावसाची उघडीप होण्याची वाट पाहात आहे. मात्र तोपर्यंत मुंबईकरांना खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यांचीच वाट मळावी लागणार आहे.

खड्डे शोधण्यासाठी नागरिकांवर भिस्त
पावसाच्या तडाख्यात मुंबई खड्डय़ात असताना पालिका मात्र खड्डय़ांची तक्रार येण्याची वाट पाहात आहे. नागरिकांकडून खड्डय़ांची तक्रार आल्यानंतर ते बुजविण्यात येत आहेत. ३० जुलैपर्यंत मुंबईत पडलेल्या २०१७ खड्डय़ांच्या तक्रारी पालिकेकडे आल्या असून त्यापैकी १८७३ खड्डे बुजविल्याचा दावा पालिकेने केला आहे. वरळी, परळ, दादर, प्रभादेवी, वांद्रे (पश्चिम), कांदिवली, मानखुर्द (पश्चिम) या भागांत खड्डा नसल्याचे पालिकेचे आकडे सांगतात. मुळात या सर्व विभागांत आजही रस्त्यांवर खड्डे आहेत, परंतु त्याची तक्रार नागरिकांकडून येत नाही तोपर्यंत ते बुजविले जाण्याची शक्यता कमीच आहे.