गणेश मंडळांना मंडप परवानगीसाठी आणखी दोन दिवसांची म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यात बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील गणपती मंडळांना मंडप परवानगी ऑनलाइन देण्याची मुदत २८ ऑगस्ट होती. त्यात आता अजून तीन दिवसची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे गणपती मंडळांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका क्षेत्रात एकुण १४६३ गणपती मंडळे आहेत. त्यापैकी मागील बुधवापर्यंत ५२७ मंडळांना मंडप उभारणीकरिता परवानग्या देण्यात आल्या होत्या. यावर्षी मंडळांचे मंडप परवान्यासाठी ११३२ अर्ज आले आहेत. ही प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने महापौरांनी यासंबंधी लवकरात लवकर परवानग्या देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. ही प्रक्रिया वेगाने व्हावी म्हणून शनिवारी तसेच रविवारीही कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. आता मंडप परवाने देण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आलीआहे. त्यानुसार गणपती मंडळांनी आता ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करून महापालिकेकडून रितसर मंडप परवानगी प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन परिमंडळ दोनचे उप आयुक्त तसेच महापालिका गणेशोत्सवाचे समन्वयक नरेंद्र बरडे यांनी केले आहे. महापालिकेच्या किचकट नियमांमुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळण्यास अडचणी येत असतात. पण महापालिका आम्हाला यासंदर्भात सहकार्य करते आहे. या निर्णयाने आमच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेवटच्या मंडळाला परवानगी मिळेपर्यंत आम्ही प्रयत्न करू, असे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two more days for the mandap permission
First published on: 29-08-2018 at 03:36 IST