उद्धव ठाकरे यांच्याकडून योगी आदित्यनाथ लक्ष्य; वसईकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराची पातळी पुन्हा घसरली. मुख्यमंत्र्यांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची तुलना कुत्र्याशी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ठाकुरांना कुत्रे संबोधून कुत्र्यांचा अवमान करणार नाही, अशी  टीका केली. स्वत:च्या मतदारसंघात पराभूत झालेले योगी आदित्यनाथ  प्रचाराला कसे हरायचे ते शिकवायला आल्याची टीकाही त्यांनी केली.

पालघर  पोटनिवडणुकीसाठी प्रचार रंगात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवेसना उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारासाठी वसईच्या एव्हरशाइन मैदानावर जाहीर सभा घेतली.

रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना कुत्रा संबोधून अवहेलना केली होती. तोच मुद्दा घेत उद्धव ठाकरे यांनीही खालच्या पातळीची टीका केली. मी कुणालाही कुत्रा, मांजर संबोधून कुत्रा, मांजरीचा अपमान करणार नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकुरांवर टीका केली. ठाकुरांनी कुत्र्याप्रमाणे इमानदार असल्याचे सांगितले, पण गळ्यात पट्टा अडकवून पुन्हा भाजपच्या मागे मागे फिरू नका, असा उपरोधिक टोला उद्धव यांनी लगावला. वसई-विरार भाजपकडे दिला होता. हिंदू मतांची विभागणी होऊ  नये म्हणून आजवर वसईकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत चूक झाल्याची कबुली त्यांनी दिली. परंतु यापुढे वसईवर लक्ष केंद्रित करून वसईतील दहशतवाद मोडून काढू, असे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही याच वेळी विरार येथील भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. जे स्वत:च्या मतदारसंघात पराभूत झाले ते  वसईत कसे हरायचे ते शिकवायला आले, अशा शब्दात उद्धव यांनी त्यांची खिल्ली उडवली. उत्तर प्रदेशातील मुलांना ऑक्सिजन देऊ  शकले नाही, ते इथे काय सुविधा देणार, असा सवाल त्यांनी केला. योगींनी पायात चपला घालून शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून महाराजांचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शिवसेनेने पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप केला होता. त्याचाही ठाकरे यांनी समाचार घेतला. गावितांना आधीच विधानसभेसाठी बोलणी करून भाजपने वनगा कुटुंबीयांशी बेइमानी केल्याचे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slam on up cm yogi adityanath palghar by elections
First published on: 24-05-2018 at 04:14 IST