मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या दोन तासांच्या बैठकीनंतरही राणेंची नाराजी दूर झाली नसून, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीनंतरच ना’राजीनाम्या’बाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे नारायण राणे यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सोमवारी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर माणिकराव ठाकरेंनी राणेंची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे निमंत्रण दिले होते. 
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नारायण राणेंना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी मिळेल अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात होती. मात्र, अशा प्रकारची कोणतीही विशेष ऑफर देण्यात आली नसल्याचेही राणेंनी या बैठकीनंतर स्पष्ट केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांच्यासोबत आपण कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेऊ, असं राणे म्हणाले.