सुहास जोशी

करोनाच्या जागतिक महासाथीत टाळेबंदीसारख्या उपाययोजनांमुळे बहुतांश उद्योग-व्यवसायांना मरणकळा आली असली तरी, या विषाणूच्या भयगंडातून निर्जंतुकीकरणाचा व्यवसाय आगंतुक भूछत्रांसारखा फोफावू लागला आहे.

विशेष म्हणजे जेथे करोनाबाधितांचे वास्तव्य किंवा संपर्काची शक्यता नाही, तेथे निर्जंतुकीकरणाची कोणतीही गरज नसल्याचा निर्वाळा महापालिकेचे अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्यानंतरही केवळ भयगंडातून मुंबई- ठाण्यातील निवासी संकुलांचे पदाधिकारी, घरमालक आपल्या संपूर्ण इमारती, घरे सरसकट निर्जंतुक करून घेण्यासाठी सरसावले आहेत. यात मोठी आर्थिक संधी दिसून आल्याने गल्लोगल्ली इमारती निर्जंतुक करून देणाऱ्या व्यावसायिकांचे पेवच फुटले आहे. या व्यावसायिकांनी जाहीर केलेली विविध पॅकेजेस ही या ‘धंद्या’तील मोठय़ा स्पर्धेचा पुरावा आहे.

सरसकट इमारत निर्जंतुकीकरणावर निर्बंध असले तरी रहिवाशांकडून अशा प्रकारची मागणी येत असल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिक सांगतात. मुंबई पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख डॉ. राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले की, जेथे करोना विषाणू नाहीत तेथे निर्जंतुकीकरणाचे उपाय करण्याची गरज नाही. मात्र, नागरिकांकडून या संदर्भात सातत्याने चौकशी होत असून पालिकेच्या २४ विभागांत निर्जंतुकीकरणाची मागणी करणारे फोन सातत्याने येत आहेत.

प्रामुख्याने ठाणे परिसरात निर्जंतुकीकरण करणाऱ्यांचा व्यवसाय तेजीत आहे. या व्यावसायिकांनी थेट महिना-दोन महिन्यांचे ‘पॅकेज’ द्यायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये चढाओढ असून अगदी पाचशे-सातशे रुपयांपासून तीन हजारांपर्यंतच्या मोबदल्यात इमारतीचे निर्जंतुकीकरण करून दिले जात आहे.  एखाद्या घरापुरते निर्जंतुकीकरणाची सुविधाही हे व्यावसायिक देत आहेत.

सूक्ष्म जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे..

शीव रुग्णालयाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुजाता बावेजा म्हणाल्या की, घरामध्ये, इमारतीमध्ये निर्जंतुकीकरणासाठी सरसकट रसायनांचा वापर करण्याची गरज नाही. साबण-पाण्याचा वापर पुरेसा आहे. अतिवर्दळीची ठिकाणे, कार्यालये अशा ठिकाणी एखाद्या वेळी निर्जंतुकीकरण करू शकता. काही व्यावसायिकांकडून दहा दिवसांतून एकदा म्हणजेच महिन्यातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे असे सुचवले जाते, मात्र तशा कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत.

स्पर्धा आणि सवलती

* सात मजल्यांच्या इमारतीच्या एका विंगसाठी २ हजार ते ३ हजार रुपये.

* सातपेक्षा कमी मजल्याच्या इमारतींसाठी १ हजार ते २ हजार रुपये.

* ५० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या वसाहतीस प्रति सदनिका १०० रुपये.

* निर्जंतुकीकरणाचा प्रभाव दहा दिवस टिकत असल्याचे सांगत महिन्यातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करण्यासाठी ३० टक्के सवलतीचे पॅकेज.