विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक; ९ हजार वाहनांवर कारवाई

राज्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक धोकादायकरीत्या केली जात असल्याचे परिवहन विभागाने केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. स्कूल बसचालक-मालकांकडून तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने नियम मोडत आहेत. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत राज्यात केलेल्या स्कूल बस तपासणीत नऊ हजार स्कूल बस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या अवैध वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उचलण्याऐवजी दंडात्मक कारवाई करण्यावरच समाधान मानले आहे.

राज्यात सध्याच्या घडीला २८ हजार ८५९ स्कूल बस आहेत. या बसमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना परिवहन विभागाकडून नियमावलीही आखण्यात आली आहे. वाहनांच्या पुढच्या व मागच्या बाजूला स्कूल बस असे नमूद करणे, प्रथमोपचार पेटी असावी, अग्निशमन उपकरणे, धोक्याचे इशारे देणारी प्रकाशयोजना, वाहनांचा वेग प्रतितास ४० किलोमीटरपेक्षा जास्त असणार नाही यासह अनेक नियमावली आखून देण्यात आली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. स्कूल बसशिवाय शालेय विद्यार्थ्यांची अन्य वाहनातूनही वाहतूक केली जाते. अशी वाहने ही अवैध ठरविली जातात. या वाहनांमधून प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे अपघाताचाही धोका संभवतो.

एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत केलेल्या कारवाईत नऊ हजार १५४ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर केलेल्या कारवाईत फक्त विभागीय तडजोड शुल्क वसुली, न्यायालयीन दंड वसूल करण्यात आला आहे. जवळपास दोन कोटी ४० लाखांहून अधिक दंड वसुली केल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे.

मुंबई आणि ठाणे, कल्याण, वाशी, वसई या ठाणे विभागात तर सर्रासपणे मोठय़ा प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे नियम मोडले जात आहे. त्याखालोखाल पुणे, सोलापूर, बारामती, पिंपरी-चिंचवड, अकलुज या पुणे विभागात आणि नाशिक, अहमदनगर, शिरामपूर, मालेगाव या नाशिक विभागातही कारवाई मोठय़ा प्रमाणात होत आहे. या संदर्भात स्कूल बस ऑनर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अनिल गर्ग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मुंबई, ठाणे विभागांत नियमांना तिलांजली

एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत संपूर्ण मुंबई शहरात केलेल्या कारवाईत एकूण ७८८ स्कूल बसवर कारवाई झाली आहे. तर स्कूल बसशिवाय अन्य वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे ८८४ अवैध वाहने आढळली आहेत. ठाणे विभागातही हीच परिस्थिती असून ६९८ स्कूल बस आणि ३५१ अवैध वाहनांवर कारवाई झाली आहे.