सध्या सुरू असलेले पायाभूत प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर पुढील तीन ते चार वर्षांत मुंबईला आखीवरेखीव स्वरूप येईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. स्वदेशी बनावटीच्या पहिल्या स्वयंचलित मेट्रो रेल्वेगाडीच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. आधीच्या सरकारने केलेली कामे नाकारत नाही, पण आम्ही त्यापेक्षा अधिक वेगाने कामे पूर्ण करत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

‘मेट्रो-२ ए’ आणि ‘मेट्रो-७’ या दोन मार्गिकांवर धावणाऱ्या पहिल्या मेट्रो गाडीचे अनावरण, चारकोप मेट्रो डेपो, प्रवासी कार्ड, मेट्रो परिचलन आणि नियंत्रण केंद्र, मेट्रो ब्रॅण्डिंग मॅन्युअल यांचे उद्घाटन शुक्रवारी चारकोप येथे मुख्यमत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.

स्वदेशी बनावटीच्या पहिल्या स्वयंचलित मेट्रो गाडीच्या आगमनामुळे मुंबईच्या प्रवासी वाहतूक यंत्रणेने एक पाऊल पुढे टाकले आहे. पुढील काळात परवडणाऱ्या घरांबरोबर परवडणारी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भारत अर्थ मूव्हर्स लि. (बीईएमएल), एमएमआरडीए या सर्व यंत्रणांनी एक अत्याधुनिक मेट्रो गाडी तयार करण्याचे काम केले आहे, असे गौरवोद्गार नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून मुंबई आणि परिसरात २०२६ पर्यंत ३३७ किमी मेट्रोचे जाळे उभारण्यात येणार आहे. त्यापैकी मेट्रो २ ए (डीएन नगर ते दहिसर) आणि मेट्रो ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या ३५ किमीच्या दोन मार्गिका मे-जून दरम्यान सुरू होतील, तर २०२२ पर्यंत १२० किमी मार्गिका कार्यरत होतील, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव म्हणाले.

नव्या मेट्रो गाडीची चाचणी मार्चमध्ये घेण्यात येईल. त्यात काही त्रुटी असल्यास बीईएमएलला कळविले जाईल. मार्चनंतर प्रत्येक महिन्याला दोन गाडय़ा मुंबईत दाखल होतील. पहिल्या यशस्वी चाचणीनंतर तीन ते चार महिन्यात दोन्ही मेट्रो मार्गिका कार्यरत होतील.

प्रवासी कार्ड

मेट्रो प्रवासासाठी बँकेच्या मदतीने विशेष प्रवासी कार्ड तयार करण्यात आले आहे. या कार्डचा वापर भविष्यात सर्व मेट्रो मार्गावर होऊ  शकेल. तसेच डेबिट/क्रेडिट कार्डाप्रमाणे त्याचा वापर करण्याची योजना आहे.

खर्च किती?

मेट्रो २ ए : यलो लाइन – दहिसर (पूर्व) ते डीएन नगर – १८.६ किमी – १६ उन्नत स्थानके – खर्च ६ हजार ४१० कोटी रुपये

मेट्रो ७ : रेड लाइन – दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व – १६.५ किमी – १३ उन्नत स्थानके – खर्च ६ हजार २०८ कोटी रुपये

वैशिष्टय़े काय?

* चालकविरहित स्वयंचलित यंत्रणा

* बांधणी देशांतर्गत झाल्यामुळे प्रत्येक डब्यामागे दोन कोटी रुपयांची बचत.

* कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रतितास

* प्रवाशांना मदत मागण्यासाठी प्रत्येक डब्यात विशेष कळ (बटन)

* प्रत्येक डब्यात सायकल आणि अपंगांची चाकाची खुर्ची ठेवण्यासाठी सुविधा

* इंटरनेट सुविधा

* प्रत्येक डब्याची क्षमता ३८० प्रवासी (५२ बैठे, ३२८ उभे)

* एका रेल्वेगाडीतून एका वेळी दोन हजार २८० प्रवाशांचा प्रवास शक्य.