डायघरमध्ये तिघांना अटक

ठाणे : अमेरिकेचे चलन विक्रीच्या बदल्यात जादा परतावा देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना शीळ डायघर पोलिसांनी अटक केली. सफिउल्ला शेख (२५) आणि याकूब शेख (२२) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत राहणाऱ्या एका ओला वाहनचालकाला सफिउल्ला आणि त्याच्या साथीदारांनी डॉलर बदल्यात भारतीय चलन दे. तसेच हे डॉलर इतरांना विक्री केल्यास त्याचा जादा परतावा मिळेल, असे सांगितले. त्यानुसार त्याने ४ सप्टेंबरला दोन लाख रुपये जमा करून ते सफिउल्ला आणि त्याच्या साथीदारांना दिले.  सफिउल्लाच्या टोळीने या चालकाला कागदामध्ये गुंडाळून हे चलन दिले. ज्यावेळी त्याने ते उघडून पाहिले त्यात कागदे आढळून आली. तोपर्यंत टोळी फरार झाली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर  चालकाने शीळ डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यातील आरोपी हे शीळ डायघर परिसरात येणार असल्याची माहिती शीळ डायघर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे, ३१ ऑक्टोबरला उपायुक्त अविनाश अंबुरे आणि साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी एक पथक तयार केले.  सापळा रचून सफिउल्ला आणि याकूब या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह् याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून डॉलर, मोबाइल आणि रोकड जप्त केली. पोलीस त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

अशी फसवणूक होते

झारखंड आणि पश्चिाम बंगाल भागातील ही टोळी आहे. या टोळीत सात ते आठ जण असतात. ही टोळी एखाद्या व्यक्तीला अमेरिकेतील मावशीचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूनंतरच्या वस्तू मिळाल्या आहेत. त्यामध्ये अमेरिकन चलन आहेत. हे चलन बदली करून आम्हाला भारतीय चलन द्या, त्यानंतर ते चलन विक्री करा, तुम्हाला भरपूर पैसे मिळतील, असे सांगत. त्यानंतर व्यक्तीने पैसे दिल्यास त्याला कागदात गुंडाळलेले चलन देऊन पसार होत. नंतर वापरलेले मोबाइल फोन बंद करत. त्यांनी अशाच प्रकारे नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई परिसरात अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.