गेल्या वर्षभरापासून डागडुजीच्या प्रतीक्षेत असलेल्या शीव उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला अखेर शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. मात्र पहिल्याच दिवशी नागरिकांना  वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अनेकांना दोन-तीन तास या वाहतूक कोंडीमुळे ताटकळावे लागले. या पुलाच्या दुरुस्तीकाळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

शीव उड्डाणपूल हा मुंबईतील महत्त्वाचा असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने २० वर्षांपूर्वी हा पूल बांधला. मात्र या पुलाच्या सांध्यांमध्ये पोकळी निर्माण झाली असून पुलाचे बेरिंग बदलण्यासाठी आणि इतर काही कामासाठी ‘एमएसआरडीसी’ने दीड वर्षांपूर्वी निविदा काढल्या होत्या. त्यानुसार डिसेंबर २०१८ला या पुलाचे काम सुरू करण्यात येणार होते. मात्र गेल्या वर्षभरापासून हे काम रखडले होते. अखेर शुक्रवारपासून या पुलावरील वाहतूक बंद करून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

दुरुस्तीच्या कामानिमित्त १४ फेब्रुवारी ते ६ एप्रिल या काळात प्रत्येक आठवडय़ातील चार दिवस हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास पूल बंद करण्यात आला. अनेक वाहनचालकांना याची कल्पना नसल्याने मुंबईतून बाहेर पडणाऱ्या वाहनांच्या रांगा दादपर्यंत लागल्या होत्या. तर शीवच्या दिशेने जाणारी वाहतूक चेंबूर सुमननगपर्यंत ठप्प झाली होती. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत या परिसरात अशाच प्रकारे वाहतूक कोंडी कायम राहिल्याने अनेक वाहनांना दादर येथून चेंबूर गाठण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी लागला होता.

वाहतूक पोलिसांचे नियोजन..

अनेक खासगी कार्यालयांना शनिवारी सुट्टी होती. त्यामुळे या मार्गावर शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केल्याने या कोंडीचा फारसा मनस्ताप वाहनचालकांना झाला नाही. सोमवारी पहाटेपर्यंत पहिल्या टप्प्याचे काम संपल्यानंतर पुन्हा या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.