‘मयूरा रे फुलवीत ये रे पिसारा’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’ अशी अवीट गोडीची गाणी संगीतबद्ध करणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार वीणा चिटको यांचे शनिवारी सकाळी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक पुत्र आहे.

गेल्या महिन्यात १४ ऑगस्ट रोजी त्यांचा ८०वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने कुटुंबीयांनी सहस्रचंद्र दर्शन सोहळा साजरा केला होता. भारतीय शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक व संगीतकार दिवंगत मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या त्या कन्या होत. मास्तरांचा संगीत वारसा व परंपरा वीणा चिटको यांनी पुढे चालविली होती. चिटको या कवयित्री, गीतकारही होत्या. त्यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. यात ‘अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे, मयूरा रे फुलवीत ये रे पिसारा’, ‘मन माझे भुलले’, ‘सखी सांज उगवली’, ‘सांग प्रिये सांग प्रिये’ आदी गाण्यांचा समावेश आहे.
गंगाधर महांबरे यांनी लिहिलेली, चिटको यांनी संगीतबद्ध केलेली आणि रामदास कामत यांनी गायलेली ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’ ही गाणीही रसिकांच्या ओठावर आहेत. मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या चीजांवर आधारित गणेशभक्ती गीतांची ध्वनिफीतही प्रकाशित झाली आहे. यातील सर्व गाणी चिटको यांनीच संगीतबद्ध केली होती, तर ज्येष्ठ गायक रामदास कामत आणि पाश्र्वगायिका उत्तरा केळकर यांनी ती गायली होती.
चिटको यांच्या पार्थिवावर दुपारी चेंबूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

‘एचएमव्ही’च्या पहिल्या संगीतकार
वीणा चिटको यांचे माहेरचे नाव प्रभा फुलंब्रीकर. त्यांचे ‘प्रभा’ हे नाव चित्रपती व्ही. शांताराम यांनी ‘प्रभात’ संस्थेवरून ठेवले होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमधून झाले. त्यांनी ‘संगीत विशारद’ ही पदवी मिळविली होती. चिटको यांनी केलेल्या कविता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘हिंदू’ मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. ‘एचएमव्ही’ ग्रामोफोन कंपनीच्या त्या पहिल्या मराठी स्त्री गीतकार आणि संगीतकार आहेत. ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांनी चिटको यांची काही गीते श्रीलंका टीव्हीवर ध्वनिमुद्रित केली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्धप्रार्थना’ ध्वनिमुद्रणातही चिटको यांचा सहभाग होता.

श्रद्धांजली

मला भावगीत गायक म्हणून ओळख ही वीणा चिटको यांच्यामुळे मिळाली. ‘मयूरा रे फुलवीत ये रे पिसारा’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’ ही आणि इतरही गाणी मी त्यांच्याकडे गायलो. गीतकार आणि संगीतकार म्हणून त्या श्रेष्ठ होत्या. गाण्याची सहजसोपी आणि अप्रतिम चाल यामुळे ही गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आणि ओठावर आहेत. – रामदास कामत (ज्येष्ठ गायक)

गणपतीच्या गाण्यांवरील एका ध्वनिफितीसाठी त्यांनी, तू गाशील का अशी मला विचारणा केली आणि मी त्यांना आनंदाने हो म्हटले, ज्येष्ठ गायक रामदास कामत आणि मी आम्ही दोघांनी ती गाणी गायली होती. त्यानंतर अधूनमधून त्या फोन करायच्या. स्वभावाने शांत आणि खूप चांगल्या होत्या. मनमिळाऊ असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
– उत्तरा केळकर (ज्येष्ठ पाश्र्वगायिका)