News Flash

भाज्यांची शंभरी, कांदाही महाग

घाऊक बाजारातील दरवाढीचा फायदा उचलत किरकोळ विक्रेत्यांनीही दर वाढवले आहेत.

महापुराच्या नावाने किरकोळ बाजारात ग्राहकांची लूट

मानसी जोशी, ठाणे

पूरग्रस्त जिल्ह्य़ातून मुंबईत शेतमालाची आवक घटल्याने भाजीपाल्यांच्या घाऊक दरांमध्ये वाढ होताच किरकोळ बाजारात पुराच्या नावाने ग्राहकांची लूट सुरू आहे. किरकोळ बाजारात सर्वच प्रमुख भाज्यांनी किलोमागे शंभरी गाठली आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ातील कांदा चाळींमध्ये पाणी शिरल्याने कांदादरही किलोमागे ३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात होणारी शेतमालाची आवक घटली. त्यामुळे वाशी आणि कल्याण या घाऊक बाजारांमधील भाज्यांच्या दरातही वाढ झाली. पूरस्थितीच्या वेळी वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ३०० ते ३५० गाडय़ांमधून भाज्यांची आवक होत होती. गेल्या काही दिवसांपासून आवक वाढली असून, सद्य:स्थितीत वाशी बाजारात भाज्यांच्या ५५० ते ६०० गाडय़ांची आवक होत आहे. मात्र, भाज्यांचे दर फारसे कमी झालेले नाहीत. कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवार, कारली, पडवळ, काकडी, गाजर, वाटाणा आणि वांगी या भाज्यांचे घाऊक दर किलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत.

घाऊक बाजारातील दरवाढीचा फायदा उचलत किरकोळ विक्रेत्यांनीही दर वाढवले आहेत. किरकोळ बाजारात कोबीची विक्री ६० रुपये किलो, फ्लॉवर १०० रुपये किलो, कारली ८० रुपये किलो, वांगी ८० रुपये किलो, भेंडी १०० रुपये किलो, काकडी ६० रुपये किलो दराने होत आहे.

पालेभाज्याही महाग

पालेभाज्यांच्या दरातही किरकोळ बाजारात ५ रुपयांनी वाढ झाली आहे. पालकची एक जुडी घाऊक बाजारात १२ रुपये तर किरकोळ बाजारात २० रुपये दराने विकली जात आहे. कांद्याच्या पातीची एक जुडी घाऊक बाजारात २० रुपये आणि किरकोळ बाजारात ३० रुपये दराने विकली जात आहे. लाल माठ प्रति जुडी किरकोळ बाजारात २० रुपये दराने विकली जात आहे. शेपूची एक जुडी घाऊक बाजारात २५ रुपये आणि किरकोळ बाजारात ३० रुपयांनी विकली जात आहे.

साखर महाग

ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरही महाग झाली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी घाऊक बाजारात साखरेची विक्री ३४ रुपये प्रति किलो दराने तर किरकोळ बाजारात ३८ रुपये प्रति किलो दराने होत होती. मात्र, आता साखरेची विक्री घाऊक बाजारात ३५.५ रुपये प्रति  किलो तर किरकोळ बाजारात ४० रुपये प्रति किलो दराने होत आहे.

कांदा महाग

जोरदार पावसामुळे नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ातील कांदा साठवण चाळींमध्ये पाणी शिरल्यामुळे तसेच हवामानात बदल झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती पेठेत कांद्याची आवक घटल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी वाशीतील कृषी उत्पन्न बाजारपेठेत कांद्याच्या फक्त २५ गाडय़ा दाखल झाल्या. एरव्ही तेथे कांद्याच्या दररोज ७५ गाडय़ा येतात. कांद्याच्या दरात घाऊक बाजारात आठवडाभरात ६ रुपयांची तर किरकोळ बाजारात १० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकीकडे भाज्या महाग असताना दुसरीकडे भाजी बनवताना आवश्यक असणाऱ्या कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नियोजन ढासळत आहे. घाऊक बाजारात कांद्याची विक्री प्रति किलो २० रुपये तर किरकोळ बाजारात ३० रुपये किलोने होत आहे. आठवडाभरापूर्वी कांद्याची विक्री घाऊक बाजारात प्रति किलो १५ रुपये तर किरकोळ बाजारात १८ रुपये किलोने होत होती. पावसामुळे कांद्याच्या चाळींमध्ये शिरलेले पाणी आणि काही ठिकाणी हवामानात बदल झाल्यामुळे साठवून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले. त्यामुळे बाजारेपेठेत कांद्याची आवक कमी होऊन दरवाढ झाली आहे, असे कृषी उत्पन्न बाजारी समितीच्या कांदा विभागाचे उपसचिव के. एल. पवार यांनी सांगितले.

भाज्यांचे दर

 भाजी            घाऊक         किरकोळ 

भेंडी              ५०                         १००

दुधी भोपळा   ४०                         ६०

कोबी            २५                          ६०

फ्लॉवर        ४०                         १००

गाजर          ३५                         ८०

फरसबी       १२०                        २२०

घेवडा         ६०                          १२०

काकडी       २०                           ६०

कारली        ३६                          ८०

पडवळ        ३५                          ६०

वाटाणा        ७०                          १००

वांगी            ४०                           ८०

 

पूरस्थितीनंतर आता भाज्यांची आवक पूर्ववत व्हायला लागल्याने येत्या काळात भाज्यांचे दर घाऊक बाजारात स्थिर राहण्याची शक्यता आहे. परंतु, किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरावर समितीचे नियंत्रण नसल्याने तिथे मोठय़ा दराने भाज्यांची विक्री केली जात आहे.

– जगन्नाथ चव्हाण, बाजारभाव निरीक्षक, वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती

बाजारात कोणतीही भाजी ३० ते ४० रुपये पाव किलोने विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे १०० रुपयांत एक ते दोन भाज्या विकत घ्याव्या लागत असल्याने सामान्य ग्राहकांचे हाल होत आहेत. ऐन श्रावणात भाज्या महाग झाल्याने कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

– सुमेधा धोपाटे, गृहिणी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 4:06 am

Web Title: vegetable price rise in mumbai due to supply affected by flood zws 70
Next Stories
1 मुंबई विद्यापीठाच्या इमारतीला युनेस्को पुरस्कार
2 भुयारी गटारद्वाराचे लोखंडी झाकण चोरणाऱ्या दोघांना बेडय़ा
3 ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’मध्ये उद्योगविश्वाचा आढावा
Just Now!
X