सचिन धानजी

मुंबईच्या महापौरांच्या कायमस्वरूपी निवासस्थानासाठी शिवाजीपार्कातील कर्मचाऱ्यांच्या जिमखान्याबरोबरच बाजीप्रभू उद्यानातील (नारळी बाग) काही जागेचाही बळी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी शिवाजीपार्क येथील महापौर निवासस्थानाची जागा देण्यात आली असून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना राणीबागेतील पालिकेच्या निवासस्थानी काही दिवस आपले बस्तान हलवावे लागणार आहे. महापौरांच्या निवासाकरिता ही जागा योग्य नसल्याने पालिकेतर्फे शिवाजीपार्क येथील महापालिका कर्मचाऱ्यांच्या जिमखान्याच्या जागेवर महापौरांकरिता प्रशस्त निवासस्थान तयार करण्याचा विचार आहे. अर्थात या जागेबरोबरच बाजूच्या उद्यानातील काही जागाही बंगल्याकरिता घेतली जाणार आहे. आधीच जिमखान्याची जागा जाणार असल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यात  उद्यानही  हिरावले जाणार असल्याने स्थानिकांचीही नाराजी ओढवणार आहे.

जिमखान्याची जागा महापौरांच्या निवासस्थानासाठी जागा अपुरी आहे.  यासाठी या जागेला जोडून असलेल्या बाजीप्रभू उद्यानाची जागा महापौरांच्या या निवासाला जोडण्यात येणार आहे. बाजीप्रभू उद्यानात (नारळी बाग) छोटय़ा मुलांकरिता खेळाचे साहित्य व हिरवळ आङे. तसेच छोटे खुले सभागृहही आहे. ते बंद झाल्यास स्थानिकांचा रोष होईल म्हणून सुरवातीला ठराविक वेळेत जनतेसाठी ते खुले राहील आणि बंद असताना त्याचा वापर महापौरांसाठी केला जाईल, असे ठरले होते. यासाठी उद्यानात जाण्यासाठी महापौरांच्या निवासस्थानात एक प्रवेशद्वाराची सोय होणार होती.

परंतु मुंबईचे प्रथम नागरिक असल्याने त्यांची  सुरक्षितता  तसेच जनतेच्या उद्यानातील वावरामुळे होणारी अस्वच्छता याचा विचार करता या उद्यानाची संपूर्ण जागा महापौर निवासाला जोडून ती बंद करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुसारच आता महापौर निवासाच्या बांधकामाचा आराखडा बनवला जात आहे.

महापौरांकरिता योग्य ठिकाणी व योग्य पद्धतीने कायमस्वरूपी निवासस्थान उभारले जाईल. त्याकरिता जागा निश्चित केली जात आहे. जागा निश्चित झाल्यावर याबाबत भाष्य करणे योग्य होईल.

– अजोय मेहता, आयुक्त, मुंबई महापालिका