विनोद तावडे यांचे प्रतिपादन; उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, ग्रंथमित्र पुरस्कारांचे वितरण
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाजमाध्यमांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. जास्तीत जास्त वाचकांना आकर्षति करण्यासाठी ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच समाजमाध्यमांचा वापर करावा आणि अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी मुंबईत केले.
ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या २०१३-१४ या वर्षांतील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ आणि ‘डॉ. एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार’ वितरण सोहळ्यात तावडे बोलत होते.
या पुरस्कारांमध्ये शहरी विभागातून ४, ग्रामीण विभागातून ४ अशा ८ ग्रंथालयांना आणि विभाग स्तरावर ६ कार्यकत्रे, ६ सेवक आणि राज्यस्तरीय १ कार्यकर्ता व २ सेवक असे एकूण २२ पुरस्कार वितरित करण्यात आले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव पा. म. ताकटे, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार आदी उपस्थित होते.
वाचनसंस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. तंत्रज्ञानाद्वारे वाचकांशी संवाद वाढविण्याचे काम ग्रंथालयांनी करावे. ग्रंथालयांसाठी जिल्हा विकास निधी पुन्हा सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही तावडे यांनी सांगितले.
ग्रंथालय संचालनालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण तसेच राष्ट्रीय ग्रंथसूचीचे प्रकाशनही तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुरस्कारप्राप्त ग्रंथालयांच्या वतीने शिव शर्मा, तर पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांच्या वतीने रमेश सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथालय उपसंचालक सु. हि. राठोड यांनी आभार मानले.