21 September 2020

News Flash

सीएसएमटीऐवजी वडाळा-पनवेल जलद हार्बर?

रेल्वे मंडळाची मंजुरी मिळाल्यास जलद हार्बरची सेवा वडाळा ते पनवेल यादरम्यानच चालवण्यात येईल.

(संग्रहित छायाचित्र)

सुशांत मोरे

उन्नत रेल्वेमार्गाचा आरंभबिंदू अलीकडे; वडाळ्यापर्यंत होत असलेल्या मेट्रो, मोनो प्रकल्पांमुळे रेल्वे विकास महामंडळाचा प्रस्ताव

दक्षिण मुंबईत होत असलेल्या मेट्रो आणि मोनो प्रकल्पांमुळे बहुचर्चित मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यानच्या जलद हार्बर उन्नत रेल्वेमार्गाचा आरंभबिंदू बदलण्याचा प्रस्ताव मुंबई रेल्वे विकास महामंडळाने तयार केला आहे. हा प्रस्ताव रेल्वे मंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून निवडणुकीनंतर त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंडळाची मंजुरी मिळाल्यास जलद हार्बरची सेवा वडाळा ते पनवेल यादरम्यानच चालवण्यात येईल.

मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील रेल्वे प्रवासी वाहतुकीचा विस्तार करण्यासाठी मार्च, २०१९ला एमआरव्हीसीने ५४ हजार कोटी रुपयांचा ‘एमयूटीपी-३ ए’ प्रकल्प मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला होता. त्या वेळी फक्त ३३ हजार ६९० कोटी रुपयांच्या प्रकल्पांनाच केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली. मात्र,  मुंबईत मेट्रो, मोनो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड प्रकल्प होणार असून त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग प्रकल्पाची मुंबईकरांना कितपत गरज आहे, हे तपासून पाहण्याकरिता फेरआढावा घ्या, अशी सूचना करण्यात आली. त्यानुसार रेल्वे विकास महामंडळाने फेरआढावा घेऊन नवा प्रस्ताव रेल्वे मंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे.

यासंदर्भात एमआरव्हीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नव्या प्रस्तावात उन्नत प्रकल्प सीएसएमटीऐवजी वडाळ्यापासून करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत १२ हजार ३३१ कोटी रुपये होती. नव्या प्रस्तावात ती दीड ते दोन हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे. भविष्यात दक्षिण मुंबईतील जनरल पोस्ट मुख्य कार्यालयापर्यंत (जीपीओ) मेट्रो जाणार आहे. त्यामुळे वडाळा ते सीएसएमटीपर्यंत रेल्वेला समांतर अशी मेट्रो होणार असल्याने उन्नत प्रकल्प वडाळ्यापासून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पात इतर कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. दरम्यान यापूर्वी पश्चिम रेल्वेवरही चर्चगेट ते विरार उन्नत मार्ग प्रकल्प होणार होता. मात्र मेट्रो प्रकल्प तसेच मार्ग उभारणीसाठी पुरेशी जागा नसल्याने चर्चगेट ते विरार उन्नत प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

कारण काय?

वडाळा ते कासारवडवली बरोबरच वडाळा ते दक्षिण मुंबईतील जनरल पोस्ट कार्यालय अशी मेट्रो जाणार आहे. त्याचप्रमाणे वडाळा ते सीएसएमटीपर्यंत लोकल गाडय़ांना प्रवाशांची तेवढी गर्दी नसते. त्यामुळे उन्नत प्रकल्प सीएसएमटीर्प्यत नेण्याची गरजही नाही, असे स्पष्टीकरण नवा प्रस्ताव सादर करताना देण्यात आले आहे.

बदल काय?

* आधी उन्नत रेल्वे सीएसएमटी ते पनवेल अशी धावणार होती. मात्र, आता ती वडाळा ते पनवेल अशी धावेल.

* या उन्नत जलद मार्गावर वडाळा, कुर्ला, टिळकनगर, चेंबूर, मानखुर्द, वाशी, नेरुळ, सीबीडी बेलापूर, खारघर, पनवेल अशी स्थानके असतील.

* नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही उन्नत मार्गाची जोड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 1:06 am

Web Title: wadala panvel fast harbor instead of csmt
Next Stories
1 परीक्षेला अनुपस्थित असतानाही विद्यार्थिनी उत्तीर्ण
2 सीएसएमटी स्थानकात लोकल ट्रेन बफरला धडकली
3 बलात्कार आणि हत्याप्रकरणी तीन वर्षांनंतर पुन्हा खटला
Just Now!
X