करोना व निर्बंधांमुळे कामे रखडल्याने पुढील वर्षीचा मुहूर्त

मुंबई : तीन वर्षांपासून बंद करण्यात आलेला लोअर परळ स्थानकाबाहेरील डिलायल रोड उड्डाणपूल अजून एक वर्ष सुरू होणार नसल्याचे दिसते. रेल्वेच्या हद्दीतील काम रखडले आहे. त्याचबरोबर मुंबई पालिकेकडून त्यांच्या हद्दीतील काम ५० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा पूल प्रत्यक्षात सेवेत येण्यासाठी पुढील वर्ष उजाडणार असून स्थानिकांना व वाहनचालकांना आणखी मनस्तापच सहन करावा लागणार आहे.

धोकादायक असल्याने लोअर परळ उड्डाणपूल दुरुस्तीसाठी वाहन आणि पादचाऱ्यांसाठी २४ जुलै २०१८ पासून बंद ठेवला. त्यानंतर रेल्वे हद्दीवरील या पुलाचा भाग तोडण्याचे काम टप्प्याटप्याने फेब्रुवारी २०१९ मध्ये पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतरही पुलाचा अन्य भागही तोडण्यात आला. टाळेबंदीत बंद काही प्रमाणातच सुरू असलेल्या रेल्वेसेवेमुळे या उड्डाणपुलाचा पाया उभारणीला सुरुवात करण्यात आली. हे काम गेल्या वर्षी करोनाकाळात कमी मनुष्यबळातच पूर्ण करण्यात आले. फेब्रुवारी २०२१ पासून करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर निर्बंध लागण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुलाच्या कामासाठी काम करणारे श्रमिक पुन्हा परराज्यात गेले, तर तांत्रिक साहित्य मिळतानाही रेल्वेसमोर समस्या निर्माण झाली. परिणामी कामाची गती मंदावली. मार्च २०२१ पर्यंत रेल्वे हद्दीतील पुलावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण केले जाणार होते, परंतु ते पूर्ण झालेले नाही.

रेल्वे हद्दीतील या उड्डाणपुलावर १६ गर्डर बसवण्यात येणार होते. त्याशिवाय आणखी          काही मोठे मुख्य गर्डरही बसविले जाणार होते. परंतु १६ पैकी आठ गर्डरचे काम पूर्ण झाले असून मुख्य गर्डरही बसविण्यात आलेले नाहीत. मुख्य गर्डर बसविण्याचे काम येत्या जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्ण केले जाईल, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. त्यानंतर अन्य छोटी कामे पूर्ण करण्यास ऑक्टोबर उजाडेल. मुंबई पालिकेनेही या पुलाच्या दोन्ही बाजूच्या त्यांच्या हद्दीतील कामाला सुरुवात केली आहे. पुलाच्या पश्चिम दिशेकडील काम ५० टक्के पूर्ण झाले असून पूर्वेकडील कामाला ऑक्टोबर २०२१ पासून सुरुवात होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे पुलाचे पूर्ण काम होऊन सेवेत येण्यासाठी पुढील वर्षच उजाडणार आहे.

वाहनचालकांना वळसा

पूल नसल्याने करी रोडवरून वरळी नाका आणि त्यापुढे जाण्यासाठी थेट मार्ग नाही. त्यामुळे अनेक जण वरळी नाक्यापर्यंत चालतच जातात, तर वाहनचालकांना भायखळामार्गे जाऊन पूर्ण वळसा मारावा लागतो. त्यात प्रचंड हाल होतात. गणपतराव कदम मार्ग, आर्थर रोड जेल मार्ग, वरळी नाका, सेनापती बापट मार्ग याशिवाय करी रोड, लोअर परळ परिसरांतील रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते.