लातूरला भीषण पाणी टंचाई असल्याने उजनी धरणातील पाणी पंढरपूरहून रेल्वेने आणण्याच्या पर्यायावर राज्य सरकार विचार करीत असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकारांना सांगितले. लातूर शहराच्या परिसरात ३५ किमी पर्यंत पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असून टँकर भरतानाही पाण्याची पळवापळवी व गोंधळ सुरु असल्याने त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती खडसे यांनी दिली.  लातूरला पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य आहे.  टँकर भरण्याचे जलस्त्रोत ज्या ठिकाणी आहेत तिथे किंवा मोठय़ा टँकरमधून छोटय़ा टँकरमध्ये पाणी भरण्याच्या ठिकाणी शेकडो लोक हंडे, बादल्या घेऊन पाणी भरण्यासाठी तुटून पडत आहेत. काही दिवसांपूर्वी पाण्याचा भरलेला टँकर पळविण्याचा प्रयत्नही झाला.