राज्यातील जलाशयांमध्ये ६८ टक्के साठा असूनही

यंदा चांगल्या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी मराठवाडय़ाची ओरड कायम राहण्याची चिन्हे आहेत. राज्यातील जलाशयांमध्ये आतापर्यंत सरासरी ६८ टक्के एवढा चांगला साठा झाला असला तरी मराठवाडय़ात ३५ टक्केच सरासरी गाठली गेली आहे.

राज्यात जून व जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला असला तरी ऑगस्ट महिन्यात मराठवाडा आणि खान्देशमध्ये मात्र पावसाची उघडीप झाली. पीक परिस्थिती तसेच पाण्याच्या साठय़ांवर त्याचा परिणाम झाला. राज्यातील विभागनिहाय आढावा घेतल्यास कोकणाने सप्टेंबपर्यंतची पावसाची सरासरी पार केली आहे. विभागनिहाय आतापर्यंत झालेला पाऊस. ही सरासरी आतापर्यंतच्या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत – कोकण (१०५ टक्के), मराठवाडा (८० टक्के), अमरावती (९० टक्के), नागपूर (८० टक्के), नाशिक (७८ टक्के) व पुणे (९० टक्के).

एकीकडे चांगला पाऊस झाला असला तरी मराठवाडा आणि खान्देशातील टँकर्सची संख्या घटलेली नाही. राज्यातील १६३८ गावे आणि ३०८२ वाडय़ांना टँकर्सनी पाणीपुरवठा करावा लागत आहे. मराठवाडय़ात १४११ तर खान्देशात ५०० पेक्षा जास्त टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.

पाण्याचा साठा विभागनिहाय – कोकण (९२ टक्के), अमरावती (६४.१४ टक्के), मराठवाडा (३४.९९ टक्के), नागपूर (६५.१८ टक्के), नाशिक (७१.२२ टक्के), पुणे (८०.२२ टक्के).

काही महत्त्वाच्या धरणांमधील साठा

कोयना (९९ टक्के), भातसा (९६.२४ टक्के), सूर्या (१०० टक्के), तिलारी (८३.२२ टक्के), घाटघर (८०.१६ टक्के), जायकवाडी (६४ टक्के), माजलगाव (शून्य टक्के), गोसीखुर्द (६३ टक्के), निळवंडे (८५ टक्के), भंडारदरा (९५ टक्के), गंगापूर (९१ टक्के), खडकवासला (९०.४० टक्के), वारणा (१०० टक्के), भीमा-उजनी (५६ टक्के),  भाटघर (१०० टक्के),  मध्य वैतरणा (१०० टक्के), बारवी (९८.५५ टक्के), तानसा (९० टक्के).