महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांना आता डॉक्टरांकडून आरोग्य प्रमाणपत्राची गरज नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. फेसबुक लाइव्हद्वारे त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले राजेश टोपे?

“आम्ही हे ठरवलं आहे की महाराष्ट्रात जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना त्यांच्या परराज्यातील गावी जायचं असेल तर आधी डॉक्टरकडून आरोग्य प्रमाणपत्र घ्यावं लागत असे. त्यासाठी गावाला जाण्याआधी त्यांना डॉक्टरच्या दवाखान्याबाहेर रांग लावावी लागत असे. हे टाळण्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. ज्या मजुरांना गावी जायचं आहे त्यांना  या प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही. ज्या मजुरांना गावी जायचं आहे त्यांचं थर्मल चेकिंग केलं जाईल. ताप आहे की नाही हे पाहिलं जाईल, ताप नसेल तर लगेचच या मजुरांना पुढे पाठवलं जाईल.”

आपल्याला मजुरांसाठी बाहेर राज्यात जाणाऱ्या ट्रेन्सही वाढवायच्या आहेत. ट्रेनने भागत नसेल तर बसेसनेही परप्रांतीय मजुरांना बाहेर पाठवलं जाईल. असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्याला संसर्ग टाळायचा आहे. त्यादृष्टीने जी काही नियमावली तयार केली जाईल त्या नियमवालीचं पालन करणं आवश्यक आहे. अनेक आवश्यक आणि गरजेप्रमाणे घेण्याचे निर्णय आहेत ते घेण्याचं काम आपण तत्परतेने केले आहेत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.