वांद्रे पोटनिवडणुकीतील पराभवानंतर नारायण राणे काय करणार, काँग्रेसमध्ये राहणार का, अशी चर्चा गेली दोन दिवस राजकीय वर्तुळात सुरू असतानाच स्वत: राणे यांनी आपण काँग्रेस पक्षाचेच काम करणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले आहे. तसेच शिवसेनेकडून लागोपाठ दोन पराभव जिव्हारी लागल्यानेच शिवसेनेच्या मागे हात धुऊन लागण्याचा निर्धार व्यक्त केला.
वांद्रे पराभवाला मीच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया राणे यांनी व्यक्त केली होती, पण त्यांचे पुत्र नीतेश यांनी पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले होते. राणे यांच्या मालकीच्या वृत्तपत्रात राणे जिंकले, काँग्रेस हरली, अशी भूमिका मांडण्यात आली होती. यामुळे राणे यांच्याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले, पण राणे यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे काम करणार आहे. पक्ष सांगेल तेथे प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वांद्रे पराभवाबद्दल काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याबद्दल आपली काहीही तक्रार नाही. सर्व नेत्यांनी चांगले सहकार्य केले. सर्वानी मेहनत घेतली, पण प्रयत्न कमी पडले. अवघ्या सहा महिन्यांमध्ये या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपची मते घटली आहेत. याउलट काँग्रेसची मते १२ हजारांवरून ३३ हजारांवर गेली. गत वेळच्या तुलनेत एमआयएमची मते घटली, पण एमआयएमला एवढी मते मिळतील, असे वाटले नव्हते. ही पोटनिवडणूक लढविणे मोठे आव्हान होते, पण हे धाडस आपण स्वीकारले होते, असेही राणे यांनी सांगितले.
शिवसेनेचे नेते आपल्यावर आरोप करीत आहेत. गेली २२ वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत काय केले, असा सवाल करीत राणे यांनी, महापालिकेतील टक्केवारीवर शिवसेनेच्या काही नेत्यांची घरे चालतात, असा आरोप केला. महापालिकेतील टक्केवारी तसेच एकूणच कारभारावरून शिवसेनेचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचेही राणे यांनी जाहीर केले.
काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात राणे यांनी आतापर्यंत तीनदा बंडाचे निशाण रोवले, पण प्रत्येक वेळा त्यांनी माघार घेतली. अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी, तर संजय निरुपम यांची मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्यावरही राणे यांनी संतप्त भावना व्यक्त केली होती. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी नेत्याची निवड व्हायला हवी होती, अशी अपेक्षा तेव्हा राणे यांनी व्यक्त केली होती. उत्तर भारतीय मतदारांमध्ये शिवसेनेने राणे यांच्या विरोधात त्या वक्तव्याचा वापर केला. उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मते शिवसेनेला गेल्याचे सांगण्यात येते. अन्य कोणताही पर्याय सध्या तरी उपलब्ध नसल्याने राणे यांना काँग्रेसमध्ये राहण्याशिवाय पर्याय नव्हता, असे काँग्रेसच्या वर्तुळात बोलले जाते.