करोनाची बाधा झालेले रुग्ण सापडल्याने चहुबाजूच्या वाटा बंद करुन पालिकेने ताब्यात घेतलेल्या वरळी कोळीवाडय़ातील दुकानांमध्ये अन्नधान्याचा खडखडाट झाला असून हाती पैसे असूनही वणवण फिरुनही गावात जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने वरळीकर हैराण झाले आहेत. त्यामुळे तातडीची बैठक आयोजित करुन घाऊक बाजारातून जीवनावश्यक वस्तूंचा अतिरिक्त साठा मागवून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.

गेल्या आठवडय़ात वरळी गावात येणाऱ्या सर्व वाटा बंद करुन वरळी कोळीवाडय़ात निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोळीवाडा ताब्यात घेताना जीवनावश्यक वस्तू घरपोच होतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सुरुवातीचे तीन दिवस कोळीवाडय़ातील रहिवाशांना दुधही मिळू शकले नाही, अशी खंत रहिवाशाने व्यक्त केली. घरातील जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपुष्टात आल्यामुळे रहिवाशांनी कोळीवाडय़ातील दुकानांमध्ये धाव घेतली. मात्र अनेकांना अन्नधान्य मिळू शकले नाही.

काही रहिवाशांच्या कोळीवाडय़ाबाहेरील नातेवाईकांनी जीवनावश्यक वस्तू देण्याची तयारी दर्शविली. मात्र कोळीवाडय़ाच्या वेशी बंद केल्यामुळे या वस्तू मिळणे अवघड झाले. परिणामी कोळीवाडय़ाच्या वेशीवर तटरक्षक दलाची इमारत आणि कल्याण केंद्राजवळी क्रूस या ठिकाणी रहिवाशांची गर्दी वाढू लागली. ही बाब लक्षात घेऊन माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्या उपस्थितीत पालिका, पोलीस आणि दुकानदारांची एक तातडीची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली. तातडीने घाऊक बाजारातून जीवनावश्यक वस्तूंचा अतिरिक्त साठा मागवून घ्यावा आणि नागरिकांना वस्तू उपलब्ध कराव्या, अशा सूचना दुकानदारांना बैठकीत करण्यात आल्या. मोठय़ा ट्रकमधून येणाऱ्या वस्तू वेशीवर उतरवून छोटय़ा टेम्पोने दुकानांपर्यंत पोहोचविण्यात येतील.

भाजीपाला, बेकरी बंद : कोळीवाडा ताब्यात घेतल्यानंतर पहिल्या दिवशीची दुध वितरणाचा पुरता बोजवारा उडाला. त्यानंतर ही व्यवस्था काही प्रमाणा सुधारली. पण गेल्या चार दिवसात भाजीपालाच पाहायला मिळाला नसल्याची तक्रार अनेक रहिवाशांनी केली. सुरुवातीचे दोन दिवस कोळीवाडय़ातील बेकरी सुरु होती, पण आता या बेकरीसाठी इंधनाची कमतरता असल्यामुळे तीदेखील शुक्रवारी बंद करण्यात आली आहे.

अफवांचे पीक : कोळीवाडय़ात करोनाबाधीत रुग्ण सापडल्यावर गेल्या चार दिवसात येथे अफवांचे पीकच आले आहे. करोनाबाधीतांची संख्या नेमकी कीती, त्या व्यक्ती कोण आहेत यावरुन अनेकानेक सुरस बातम्या येथील रहिवाशांमध्ये फिरत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याबाबत अधिकृत खुलासा नागरिकांपर्यंत पोहचवावा अशी अपेक्षा रहिवाशी व्यक्त करत आहेत.

पोदारमध्येही असुविधा

वरळी कोळीवाडय़ातील करोना संशयीतांना पोदार रुग्णालयात विलगीकरणात ठेवले असून, तेथे सर्व व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र तेथे अपुरी प्रसाधनगृहे, अपुऱ्या गाद्या, जेवणाची चांगली व्यवस्था नाही अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.