बेस्ट उपक्रम मुंबईकरांना ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर विद्युतपुरवठा आणि परिवहन सेवा पुरविण्याचे काम करीत आहे. बेस्टचे हे दोन्ही विभाग स्वतंत्र आहेत. पण काही वर्षांपासून बेस्टच्या परिवहन विभागाचा तोटा सातत्याने वाढत आहे. निकृष्ट दर्जाची बस खरेदी, वारंवार बसगाडय़ा बंद पडणे, बस वाहक-चालकांकडून प्रवाशांना मिळणारी वागणूक, वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या बसगाडय़ा, बस प्रवर्तनातील (फ्रिक्वेन्सी) बेशिस्त, प्रयोगशीलतेचा अभाव अशा एक ना अनेक कारणांमुळे परिवहन विभाग डबघाईला आला आहे.

रेल्वे आणि बेस्ट बस या दोन्ही मुंबईच्या जीवनवाहिनी. अगदी भल्या पहाटे दहिसर, वसई, नालासोपारा, विरार, तर कल्याण, बदलापूर कसारा, पनवेल आदी भागांतून नागरिक रेल्वेने मुंबईत येतात. दिवसभर कार्यालयात काम करतात आणि पुन्हा धावतपळत रेल्वे पकडून रात्री घर गाठतात. तर मुंबईकरांना अगदी मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे काम गेली अनेक वर्षे बेस्टची बस इमानेइतबारे करीत आली आहे. त्यामुळेच रेल्वे आणि बेस्ट या मुंबईच्या जीवनवाहिनी ठरल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती वा अन्य काही कारणांमुळे रेल्वे आणि बेस्ट बसची वाहतूक कोलमडली तर अवघी मुंबापुरी ठप्प होते. मग घरी पोहोचण्यासाठी मुंबईकरांना पायपीट करावी लागते, याचा अनुभव गेल्या काही वर्षांत अनेकांना आला आहे. त्यामुळे रेल्वे आणि बेस्ट बस या दोन्ही मुंबई, मुंबईकर आणि मुंबई दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने सोयीच्या ठरल्या आहेत असेच म्हणावे लागेल.

layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

गेल्या काही वर्षांत मुंबईची लोकसंख्या वाढत गेली आणि त्याचा ताण रेल्वेवर पडू लागला. प्रचंड गर्दीमुळे रेल्वेच्या गाडय़ांमध्ये चढणेही प्रवाशांना जिकिरीचे होऊ लागले आहे. शहरातील वाहनांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे बेस्टच्या बसगाडय़ा वाहतूक कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे बेस्ट बसऐवजी गर्दीने भरणाऱ्या रेल्वेने जाणे मुंबईकर पसंत करीत आहेत. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी बेस्टने काही पर्याय शोधणेचे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बसमार्ग आजूबाजूच्या रस्त्यांवरून वळविणे शक्य आहे, का याची चाचपणीची गरज आहे. पण बेस्टकडून तसे प्रयत्नच झालेले नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या बसगाडय़ांवर होणारा खर्च वाढत गेला आणि त्याची बेस्ट उपक्रमाच्या तोटय़ात भर पडत गेली.

बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागाकडून मुंबई शहरात म्हणजे कुलाब्यापासून वांद्रे आणि शीवपर्यंत विद्युतपुरवठा केला जातो. इतक्या मर्यादित भागात विद्युतपुरवठा केल्यानंतरही बेस्टचा हा विभाग नफ्यात आहे. पण मुंबईकरांना परिवहन सेवा देणे गरजेचे असल्यामुळे बेस्ट उपक्रमाने विद्युतपुरवठा विभागाचा नफा परिवहन विभागातील तोटा भरून काढण्यासाठी सुरुवात केली आणि आता विद्युतपुरवठा विभागही डबघाईच्या दिशेने निघाला आहे. आगामी वर्षांमध्ये विद्युतपुरवठा विभागाला तुलनेत कमी नफा होईल, असा अंदाज बेस्ट उपक्रमाने आपल्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. बेस्ट उपक्रमासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

गेली काही वर्षे बसगाडय़ाची खरेदी असो वा कर्मचाऱ्यांना बोनस देणे असो, आर्थिक मदतीसाठी बेस्ट पालिकेकडे आशाळभूतपणे पाहत आली आहे. बेस्ट उपक्रम पालिकेचे एक अंग आहे. म्हणून पालिकेने बेस्टला आर्थिक मदत करावी असेच उपक्रमातील अधिकारी, कर्मचारी आणि राजकारण्यांचे मत आहे. पण बेस्ट जेव्हा नफ्यात होती, तेव्हा ज्याचे अंग आहोत त्या पालिकेच्या तिजोरीत उपक्रमाने एक छदामही भरलेला नाही. मग बेस्टने पालिकेकडून आर्थिक मदतीची अपेक्षा का ठेवावी, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बेस्ट उपक्रमामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांची खोगीरभरती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि अन्य सुविधांवर मोठा खर्च होत आहे. त्यामुळे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सुचविल्याप्रमाणे बेस्ट उपक्रमात सक्तीची सेवानिवृत्ती जाहीर करणे गरजेचे आहे. आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग ठेवून बेस्ट उपक्रमाचा कारभार हाकणे योग्य ठरेल. पण त्याच वेळी सक्तीने सेवानिवृत्ती घेणाऱ्यांचेही आर्थिक नुकसान होणार नाही याचीही बेस्टने काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कामगार संघटनांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तसे केल्यास कुरकुर न करता हा प्रश्न मार्गी लागू शकेल.

बेस्ट उपक्रमाने नव्या कोऱ्या बसगाडय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने बेस्टला १०० कोटी रुपये दिले आहेत. बेस्टच्या तिजोरीत पालिकेने १०० कोटी रुपये जमा केलेले असताना उपक्रमाने १५९ कोटी रुपयांच्या बस खरेदीचा करार केला आहे. आता वरच्या ५९ कोटी रुपयांचा प्रश्न निर्माण झाला आहे. तिजोरी खंक झालेली असताना बेस्टने बस खरेदीसाठी अधिक पैशांचा करार का केला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता ५९ कोटी रुपये पालिकेने द्यावे अशी बेस्टची अपेक्षा आहे. बेस्टने बसगाडय़ा खरेदी करण्याऐवजी त्या भाडय़ाने घ्याव्या, असे पालिका आयुक्तांचे म्हणणे आहे. खरेदी केलेल्या बससाठी बेस्टला प्रतिकिलोमीटर १०० रुपये खर्च अपेक्षित आहे. पण त्याच वेळी भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसगाडीसाठी प्रतिकिलोमीटर ६० रुपये खर्च येऊ शकतो. असा ताळेबंद मांडत पालिका आयुक्तांनी बसगाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याची सूचना बेस्टला केली आहे. पण बेस्टला ही सूचना मान्य नाही.

मुंबईत आजही अनेक ठिकाणी बेस्टच्या बसगाडय़ा रिकाम्या धावताना दिसतात. काही वेळा एकाच क्रमांकाच्या दोन-तीन बसगाडय़ा एकामागोमाग सोडल्या जातात. यामुळे मागच्या बसगाडय़ा प्रवाशांशिवाय धावत असतात. हा नियोजनातील बेशिस्तपणा आहे. याकडेही बेस्ट उपक्रमाचे लक्ष नाही. वाहतूक कोंडीमुळे बसगाडय़ा आगारात विलंबाने पोहोचतात आणि त्यामुळे त्या एकामागून एक सोडल्या जातात, असे केविलवाणे कारण बेस्टकडून दिले जाते. पण अशा परिस्थितीत बेस्ट बसगाडय़ांच्या वेळापत्रकात थोडेफार बदल करून बसगाडय़ा एकामागोमाग सोडण्याऐवजी काही वेळाच्या अंतराने सोडल्यास बेस्टला होणारा तोटा काही अंशाने टाळता येऊ शकतो. बस आगारांमध्ये घडाळ्याच्या काटय़ाकडे बघत बसगाडय़ा सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना ते समजणे गरजेचे आहे. एकामागून एक दोन-तीन बसगाडय़ा गेल्यानंतर बस थांब्यावर पोहोचणाऱ्या प्रवाशांना बसची वाट पाहात ताटकळत उभे राहावे लागते. असे प्रवासी कंटाळून मग टॅक्सीचा पर्याय निवडतात. या गोष्टीचा आगारातील कर्मचाऱ्यांही विचार करणे गरजेचे आहे.

काही वर्षांपूर्वी एस. टी. महामंडळही तोटय़ात चालत होते. महामंडळ बंद पडण्याची भीती कर्मचाऱ्यांच्या मनात घर करून बसली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन काही उपाययोजना सुचविल्या आणि प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केली. महामंडळाचे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी पडत्या काळ्यात खांद्याला खांदा भिडवून काम केले. म्हणूनच आज एस. टी. महामंडळ सावरले गेले. बेस्टचे कर्मचारी उपक्रमाच्या मदतीला आजही पुढे का येत नाहीत हेच समजत नाही. आपल्या घरावर एखादे संकट आले, किंवा एखादी मोठी समस्या निर्माण झाली, तर ती सोडविण्यासाठी शेजाऱ्याकडे धाव घेतो का? कुटुंब एक होऊन त्या समस्येचे निराकरण करतो. बेस्ट हेही एक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कुटुंबच आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन बेस्टला तोटय़ाच्या गर्तेतून बाहेर काढायला हवे. पण बेस्ट मानणारेच कर्मचारी ते करू शकतात. प्रशासन, अधिकारी-कर्मचारी आणि कामगार संघटनांनीही कुणाकडेही भिक्षापात्र घेऊन न जाता बेस्टला आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला त्याग भावनेला करावे लागेल.