राष्ट्रपतींचे आवाहन; आर्थिक स्वातंत्र्यात बँकांची भूमिका महत्त्वाची

नोकरी मिळत नाही म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो, अशी अगतिकता बाळगू नका, तर नोकरीतील संधी भलेही सोडा, पण मी स्वत: रोजगार निर्माता बनेन, स्वत:चा व्यवसाय सुरू करेन अशी जिद्द ठेवून उद्योग व्यवसायातील छोटय़ा-मोठय़ा संधींचा लाभ घेत नोकऱ्या मागणारे नव्हे तर नोकऱ्या देणारे बना, असा मंत्र राष्ट्रपती डॉ रामनाथ कोविंद यांनी रविवारी येथे दिला.

ठाणे जिल्ह्य़ातील उत्तन येथील रामभाऊ  म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘आर्थिक जनतंत्र परिषदे’चे उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती बोलत होते. त्यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, राज्यपाल डॉ. चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, ‘नाबार्ड’चे अध्यक्ष हर्ष कुमार आदी उपस्थित होते.

या परिषदेत उपस्थित ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातील मुद्रा योजना, दलित व्हेन्चर कॅपिटल, स्टार्ट अप अशा योजनांचा लाभ घेतलेल्या २०० यशस्वी उद्योजकांना राष्ट्रपतींनी मार्गदर्शन केले. संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांनी खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे. समाजातील काही वंचित आणि शोषित युवक रिफायनरी, रुग्णालय, हॉटेल्स अशा व्यवसायांमध्ये स्वत:ला सिद्ध करून यशस्वी होत आहेत. ‘डिक्की’सारखी संस्था त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करीत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचे यावेळी कौतुक केले. महिलांनी आता केवळ बचत करण्याची प्रवृत्ती सोडून गुंतवणूक करायला शिकले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

युवा उद्योजकांचा देश- मुख्यमंत्री

‘आर्थिक जनतंत्र’सारख्या परिषदेमुळे आणि त्यातील अनुभव कथनामुळे प्रगतीचा नवा मार्ग आपल्याला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

सक्षमीकरण हा शब्द उच्चारायला सोपा आहे. मात्र प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी खूप प्रयत्नांची गरज आहे. परंतु, पंतप्रधानांनी त्याची सुरुवात केली असून वंचित आणि दुर्बल घटकांनादेखील आर्थिक अधिकार मिळतील अशा योजना आणल्या आहेत. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. तर अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी आभार मानले. मिलिंद बेटावदकर , रवींद्र साठे यांनी सूत्रसंचालन केले.

मी एक प्रशिक्षणार्थी..

रामभाऊ  म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आपण यापूर्वी १० ते १२ वेळा विविध विषयांवर प्रशिक्षण घेण्यासाठी आलो. एक तुमच्यासारखाच प्रशिक्षणार्थी म्हणून मी प्रमोद महाजन आणि विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. या संस्थेच्या आवारात आज मी राष्ट्रपती म्हणून आलो असलो, तरी येथील अनेक आठवणी जाग्या झाल्या, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.