मुंबईकरांनो, पावसाळी पिकनिकला जायचेय? मग या १० ठिकाणी भेट द्या!

मित्रमंडळी, ऑफिस अशा सर्व ठिकाणी वर्षासहलीच्या गप्पांनी जोर धरला आहे. शहरापासून दूर जंगलात डोंगरदऱ्यांमध्ये अथवा कुठल्याही निसर्गरम्य ठिकाणी पावसामध्ये चिंब भिजण्याचा आनंद काही औरच असतो.

पावसाळा! सर्वांचा एक अतिशय आवडता ऋतू. पावसाच्या सरी कोसळायला सुरूवात झाली तसे मित्रमंडळी, ऑफिस अशा सर्व ठिकाणी वर्षासहलीच्या गप्पांनी जोर धरला आहे. शहरापासून दूर जंगलात डोंगरदऱ्यांमध्ये अथवा कुठल्याही निसर्गरम्य ठिकाणी पावसामध्ये चिंब भिजण्याचा आनंद काही औरच असतो. पण, कार्यलयातील कामामुळे काही जणांना सुट्टी मिळत नाही. मग आठवड्याच्या एक दिवसाच्या सुट्टीमध्ये काय करायचे? असा प्रश्न उभा राहतो. एका दिवसांमध्ये तुमची सहल होईल अशा काही मुंबईजवळील पर्यटनस्थाळाची माहिती आज सांगणार आहोत. एक ते दोन दिवसाच्या सुट्टीमध्ये तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबासमवेत फिरायला जाऊ शकता.

माथेरान –
येथील निसर्ग सौंदर्य, जंगल नेहमीच इथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालते. समुद्रसपाटीपासून २६२५ फूट उंचीवर असलेल्या माथेरानमध्ये वेगवेगळे पॉईंटस आहेत. पावसाळयात माथेरानचे जंगल पालथे घालणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. गर्द हिरव्यागार झाडीतून चालताना एक वेगळ आनंद मिळतो. माथेरानमध्ये सहकुटुंब येणाऱ्यांसाठी रिसॉर्टचाही पर्याय उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांमध्ये माथेरानचा समावेश होते. माथेरानमध्ये वाहनांना परवानगी नाहीय. त्यामुळे दस्तुरी कार पॉईंटपर्यंत तुम्ही वाहन नेऊ शकता. तिथून मातीच्या रस्त्यावरुनच माथेरानची भ्रमंती करावी लागते. वयोवुद्ध व्यक्तिंसाठी इथे घोडयांची व्यवस्था आहे. इथली शांतता आणि गर्दी वनराईच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही.

– माथेरान मुंबईपासून १०० तर पुण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे.

– मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटीहून तुम्ही ट्रेन पकडल्यानंतर दीड ते दोन तासात नेरळला पोहोचता. नेरळला स्टेशनला उतरल्यानंतर तिथून तुम्ही टॅक्सीने किंवा टॉय ट्रेनने माथेरानच्या पायथ्याशी जाऊ शकता.

येऊर –
पक्षी निरीक्षण आणि जंगल भ्रमंतीची आवड असलेल्या अनेकांची येऊरला पसंती असते. फक्त तास-दीडतासात तुम्ही येऊरला पोहोचू शकता. छोटया-छोटया टेकडया आणि जंगलामुळे इथे भटकंती करताना एक वेगळा आनंद मिळतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ४० किलोमीटरचा भाग येऊरमध्ये मोडतो. विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्ष्यांनी हे जंगल समृद्ध आहे. पावसाळयात येऊरच्या जंगलाचे सौंदर्य अधिक खुलून येते.

– येऊर ठाणे जिल्ह्यात असून मुंबईपासून फक्त २५ किलोमीटर अंतरावर आहे.

चिंचोटी
पावसाळयात प्रत्येकजण धबधब्याला विशेष पसंती देतो. कडे-कपारीतून कोसळणाऱ्या धबधब्याखाली उभे राहण्यात एक वेगळी मजा असते. पावसाळयात मुंबई-अहमदाबाद मार्गावरील चिंचोटी धबधब्याकडे तरुणाईची पावले वळतात. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी गर्द हिरव्यागार झाडीतून मार्ग काढावा लागतो. एक ते दीड तास पायपीट केल्यानंतर तुम्ही या धबधब्यापर्यंत पोहोचता.

– चिंचोटी पालघर जिल्यात येते. मुंबईपासून साधारणपणे दोन ते तीन तासांमध्ये येथे पोहचता येईल.

– ट्रेनने नायगाव रेल्वे स्टेशनला उतरुन रिक्षाने जाता येते.

संजय गांधी नॅशनल पार्क
संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबई जवळ असलेले उत्तम ठिकाण आहे. अनेक मुंबईकर पिकनिकचा प्लान आखतात तेव्हा हे ठिकाण त्यांच्या ध्यानी-मनीही नसते. मुंबई पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पावसाळयात एक वेगळा अनुभव मिळतो. १०३.८४ किलोमीटर पर्यंत नॅशनल पार्क पसरले आहे. वेगवेगळया प्रकारची झाडे, वनस्पती, प्राणी, पक्ष्यांनी हे जंगल समृद्ध आहे. या पार्कमध्ये सुद्धा पावसाळयात वेगवेगळया ठिकाणी नैसर्गिक धबधबे तयार होतात. शिवाय २४०० वर्षापूर्वीच्या कान्हेरी गुफा सुद्धा इथे आहेत. नॅशनल पार्कमध्ये तंबूमध्ये निवासाची सोय उपलब्ध आहे.

मुंबईतून साधारणपणे एक ते दोन तासांत पोहचू शकतात.

ट्रेनने बोरीवली स्थानकावर उतरुन बस किंवा रिक्षाने इथे जाता येते.

गोराई
गोराई समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असून मुंबईच्या उत्तरेला वसलेले एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. बोरीवली व भाईंदरवरुन तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. पश्चिम रेल्वे मार्गावरुन बोरीवलीच्या दिशेने जाणारी कोणतीही ट्रेन पकडा. प्रत्येक फास्ट ट्रेन बोरीवलीमध्ये थांबा घेते. बोरीवली स्थानकात उतरल्यानंतर तुम्ही बस किंवा रिक्षाने गोराईला पोहोचा. तिथून लाँचने तुम्हाला गोराई किनाऱ्यावर जाता येते. गोराईमध्ये रिसॉटर्स आणि राहण्याची व्यवस्था आहे. इथल्या किनाऱ्यावर फिरताना मनाला एक वेगळीच शांतता, प्रसन्नता मिळते.

इगतपूरी –

मुंबई-नाशिक महामार्गावर असलेलं इगतपुरी एकदिवसाच्या पर्यटनासाठी उत्तम पर्याय असू शकतो. इगतपुरी तालुक्याला निसर्गाचे अमाप वरदान लाभले आहे. या तालुक्यात ऐतिहासिक, धार्मिक महत्व असलेली अनेक ठिकाणे आहेत. पावसाळ्यात घाटमाथा, डोंगर-दऱ्या सर्वत्र परिसर हिरवागार होतो. कसारा घाटात पाऊस आणि धुक्याचा रंगणारा खेळ, भावली धरण परिसरातील धबधबे, वैतरणा मार्गावरील हिरवाईने नटलेला चौफेर प्रदेश, घाटनदेवी परिसर, दारणा, वैतरणा या धरणांचा परिसर, कावनई अशी अनेक ठिकाणं पाहता येतील. इगतपुरी तालुक्यालगत असलेल्या भंडारदरा, कळसूबाई, अलंग, कुरूंगवाडी, त्र्यंबकेश्वर येथेही भेट देऊ शकता. डोंगरांजवळून जाणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांवर डोंगरावरून येणारे पाणी येत असून काही ठिकाणी लहान-मोठे धबधबे तयार झाले आहेत.

मुंबईपासून फक्त १२० किमीच्या अंतरावर आहे. ट्रेन अथवा बसनेही जाऊ शकता. त्याचप्रमाणे खासगी गाडीनेही तुम्ही जाऊ शकता. साधारणपणे तीन ते चार तासांमध्ये तुम्ही इगतपुरीमध्ये पोहचाल.

अलिबाग –

हिरवागार निसर्ग, निळाशार समुद्र, नारळ-पोफळीच्या बागा ही अलिबागची खासियत. अलिबागहून बारा मैलावर उत्तरेकडे मांडव्याचा अतिसुंदर निवांत समुद्र किनारा आहे. इथे फारशी वर्दळ नसते. मांडवा गाव स्वत:चं खास व्यक्तिमत्व जपून आहे. नारळीच्या बागांनी समृद्ध असा हा शांत परिसर आहे. तुम्हाला थोडा वेगळा अनुभव घ्यायचा असेल, तर किहिमच्या सागर किनाऱ्यावरील तंबूमध्ये व्यास्तव्य करून पाहा. अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी मुंबई-गोवा या प्रमुख मार्गाने जाता येते. या मार्गावर असलेल्या वडखळ या ठिकाणापासून पुढे अलिबागला जाण्यासाठी मार्ग आहे.हे अंतर मुंबईपासून १०८ कि.मी.आहे.

भोरगिरी-भीमाशंकर
महाराष्ट्राच्या मानचिन्हांपकी एक असलेले शेकरू अर्थात तांबूस खार पाहायची असेल आणि घनदाट निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचा असेल तर एकदा भीमाशंकरला जायलाच हवं. सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पश्चिम घाट परिसरात भीमाशंकर अभयारण्य वसलं आहे. अभयारण्याचं संपूर्ण क्षेत्र १३०.७८० चौ.किमी. असून, १९८५ मध्ये या क्षेत्राला अभयारण्य घोषित करण्यात आले. मुंबईहून भीमाशंकरला जायचं असेल तर लोणावळा, तळेगाव, चाकणमाग्रे मंचर असं जाता येतं. भीमाशंकर आणि आसपासची ठिकाणं पाहायची असतील तर खासगी वाहनाने जाणं केव्हाही सोयीचं ठरतं.

माळशेज –
माळशेज घाट म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या मुसळधार सरी, दाट धुके, उत्तुंग कडे, पावसाने न्हाऊन निघालेले काळे भिन्न कडे, भन्नाट वारे, आकर्षित करणारी हिरवाई अन् मधून डोकं वर काढून वाऱ्यावर डोलणारी रंगीबेरंगी रानफुले

मुंबईपासून फक्त १२६ किमी आहे. साधरणपणे चार तासांत तुम्ही माळशेज घाटात पोहचू शकता.

लोणावळा-खंडाळा –
लोणावळा-खंडाळा हे निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे. लोणावळा व खंडाळा शहराचा निसर्गरम्य परिसर, हिरव्यागार डोंगररांगा, त्यातून वाहणारे धबधबे, सकाळी व सायंकाळी डोंगरकपारीतील धुक्याची चादर असा हा सर्व निसर्गरम्य परिसर मनाला हवाहवासा वाटतो. लोणावळ्याच्या आजूबाजूला असणारे गडकिल्ले व लेण्या येथील इतिहास व प्राचीनतेची साक्ष देतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 10 picknick spots near to mumbai in monsoon nck

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!