आघाडी सरकाला मागे टाकून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने ‘१०० दिवसांचा लेखाजोखा’ ही आपल्या कामाची एक पुस्तिका आज प्रकाशित केली. या पुस्तक प्रकशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुभाष देसाई, पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
‘टोलमुक्त महाराष्ट्र’ ही आमची संकल्पना आहे. मात्र हे आमच्या घोषणापत्रात नाही. जुन्या सरकराने टोलवसुलीसाठी करार करताना खूप त्रुटी ठेवल्या आहेत, त्यामुळे हे टोल सरसकट रद्द करता येणार नाही. मात्र, जाचक टोलमधून राज्याला मुक्ती मिळाली पाहिजे, हे आमचे धोरण आहे. त्याकरता कायदेशीर मार्ग शोधावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य कर्जबाजारी असताना आमच्या हातात आले आहे. युतीचे सर्व मंत्री दक्षतेने लोकाभिमुख निर्णय घेत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवरही टीका केली आहे. आघाडी सरकारमुळे राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आणि राज्याची पीछेहाट झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीने 6 हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी एल अँड टी कंपनीसोबत करार , सातबारा ऑनलाईन होणार असून त्याची ई-मोजणी , ऑनलाईन आरटीआय, गृह विभागात दोन नव्या फॉरेन्सिक लॅबची निर्मिती, माहितीच्या अधिकाराचा कायदा ऑनलाईन होणार, पोलिसांना सुटय़ाच्या बदल्यात एका दिवसाचा पगार आदी  मुद्दे या १०० दिवसांच्या लेखाजोखामध्ये आहेत.