मुंबईतलं सर्वात लोकप्रिय मंडळ अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजा गणेश विसर्जनासाठी तब्बल ३५ तास लागले. यंदा पहिल्यांदाच लालबागचा राजा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रात्री ८.३० ते ९ च्या आसपास विसर्जित झाला. लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पंढरीच्या वारीत जसे हौशे, नौशे आणि गवशे असतात तसाच प्रकार इथेही घडला. लालबागचा राजा गणपतीला निरोप देण्यासाठी आलेल्या भक्तांचे मोबाइल, सोन्याचे दागिने आदी सगळं चोरीला गेल्याच्या घटना आता समोर आल्या आहेत.
पोलिसांनी काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लालबागचा राजा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर आलेल्या गणेशभक्तांचे १०० हून अधिक फोन चोरीला गेले. काळा चौकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रारी नोंदवण्यात आल्या. या प्रकरणात अद्याप चार आरोपींना अटक कऱण्यात आली आहे त्यांच्याकडून चार मोबाइल ताब्यात घेण्यात आले आहेत. तसंच सोनसाखळी चोरी झाल्याच्याही अनेक तक्रारी काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंदवल्या गेल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १२ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर दोन सोन्याच्या चेन यांच्याकडून ताब्यात घेतल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात संमतीशिवाय ड्रोन वापरल्या प्रकरणीही गुन्हे दाखल झाले आहेत.
१०० हून अधिक मोबाइल चोरीला
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत सोन साखळी चोरीचे अनेक प्रकार घडले. तसंच अनेक भक्तांचे मोबाइल फोन चोरीला गेले आहेत. आमच्याकडे मोबाइल चोरीला गेल्याच्या १०० तक्रारी आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. विसर्जन मिरवणुकीत या भुरट्या चोरांच्या टोळ्याही सहभागी झाल्या होत्या. त्यांनी गर्दीचा गैरफायदा घेत चोरी केली आणि १०० किंवा त्याहून अधिक मोबाइल लंपास केले असं पोलिसांनी म्हटलं आहे. टाइम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे.
रविवारी नेमका विसर्जनाला विलंब का झाला?
लालबागचा राजा गणपती शनिवारी सकाळी १० वाजता मुख्य मंडपातून निघाला होता. तब्बल २२ तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर रविवारी सकाळी आठ वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आला होता. त्यानंतर आरती होऊन दीड-दोन तासात गणपतीचे विसर्जन होणे अपेक्षित होते. मात्र, तोपर्यंत समुद्राला मोठी भरती आली. त्यामुळे लालबागचा राजाचा पाट जड झाला. हा पाट स्वयंचलित तराफ्यावर चढवून गणपतीला तराफ्यावर आरुढ करण्यात अनेक अडचणी आल्या. सर्वात मोठी अडचण होती ती तराफा बाहेर आणि मूर्ती आत अशी.यापूर्वी लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी वापरण्यात येणारा तराफा वेगळा होता. यंदा नव्याने तयार करण्यात आलेल्या तराफ्याचा आकार दुप्पट आहे. समुद्राला भरती आल्यामुळे हा तराफा हलत होता. त्यामुळे लालबागचा राजाची मूर्ती हायड्रोलिक्सने वर घेण्यात अडचण येऊ लागल्या. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून लालबागचा राजाला तराफ्यावर आरुढ करण्याचे प्रयत्न सुरु झाले. पण अखेरीस दुपारी ४.३० च्या सुमारास लालबागचा राजा तराफ्यावर आरुढ झाला. त्यानंतर सुरु झाली ती भरतीची प्रतीक्षा. या सगळ्यात लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन होण्यासाठी ३५ तास लागले. लालबागचा राजा गणेशमूर्ती जेव्हा तराफ्यावर आरुढ होण्यात अडचणी येत होत्या तेव्हा भक्तांच्या मनात कालकालव सुरु झाली होती. अखेर काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर असाही धावा काहींनी केला. अनेकांना अश्रू अनावर झाले. दरम्यान दुपारी ४.३० च्या सुमारास राजा तराफ्यावर आरुढ झाला. त्यानंतर रात्री ९ च्या दरम्यान विसर्जन सोहळा पार पडला.