मुंबई : देशातील महत्वाच्या परीक्षांपैकी एक असलेल्या ‘सीए’ अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) नोव्हेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून ११ हजार ५०० विद्यार्थी हे ‘सीए’ म्हणून पात्र ठरले आहेत. सीए अंतिम परीक्षेतील पहिल्या ग्रुपचा निकाल १६.८ टक्के, दुसऱ्या ग्रुपचा निकाल २१.३६ टक्के लागला. तर दोन्ही ग्रुप मिळून निकाल टक्‍के १३.४४ टक्के लागला आहे.

दरम्यान, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०२४ मध्ये ‘सीए’ अंतिम परीक्षा ही ४४३ केंद्रांवर घेण्यात आली होती. तब्बल १ लाख १ हजार ४३० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र ठरले.‘सीए’ अंतिम परीक्षेतील पहिल्या ग्रुपमधून ६६ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ११ हजार २५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, दुसऱ्या ग्रुपमधून ४९ हजार ४५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुप मिळून ३० हजार ७६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ४ हजार १३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

हेही वाचा…फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच

हैदराबादमधील हेरंब महेश्वरी आणि तिरुपती येथील ऋषभ ओसवाल यांनी ८४.६७ टक्के (५०८ गुण) मिळवत संपूर्ण देशातून पहिला येण्याचा बहुमान पटकावला. त्यानंतर अहमदाबाद येथील रिया शाह हिने ८३.५० टक्के (५०१ गुण) मिळवत द्वितीय स्थान आणि कोलकत्ता येथील किंजल अजमेरा हिने ८२.१७ टक्के (४९३ गुण) मिळवत तिसरे स्थान पटकावले.

‘देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण होणे, हे आयुष्यातील खूप मोठे यश आहे. ’सीए’ होणे हा तुमच्या दृढनिश्चयाचा, त्याग आणि कठोर परिश्रमाचा एक शक्तिशाली पुरावा आहे. या संपूर्ण वर्षात ३१ हजार ९४६ हून अधिक विद्यार्थी हे ‘सीए’ अंतिम परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले, यावरून ‘सीए’ परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांची आवड आणि मेहनत लक्षात येते. मी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो’, असे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाचे संचालक सीए रणजीत कुमार अग्रवाल यांनी सांगितले.

हेही वाचा…निर्मलनगर पुनर्विकासातच कायमस्वरुपी घरे द्या संक्रमण शिबिरार्थी ठाम, किती वर्षे संक्रमण शिबिरार्थी म्हणून राहायचे, रहिवाशांचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सीए’ अंतिम परीक्षेचा निकाल कसा पाहाल?

‘आयसीएआय’तर्फे नोव्हेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या ‘सीए’ अंतिम परीक्षेचा निकाल आणि तपशील हा http://www.icai.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थी हे बैठक क्रमांकासह (रोल नंबर) नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन क्रमांक) किंवा पिन क्रमांक नमूद करून निकाल पाहू शकतील.