राष्ट्रीय पुरातत्त्व विभागाशी कराराची चाचपणी ; रायगड महोत्सवाचे उद्घाटन

#गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, आगामी काळात यासाठी व्यापक पाऊले उचलली जाणार आहेत, राज्यातील पाच किल्ल्यांच्या संवर्धनासाठी १२ कोटी रुपयांच्या विशेष आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. या संदर्भात राष्ट्रीय पुरातत्व विभागाशी बोलणी सुरु असून, लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते किल्ले रायगडावर आयोजित रायगड महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.

महाराष्टला वैभवशाली इतिहास असून तो जागृत ठेवण्यासाठी शासनाकडून सर्व प्रकारे प्रयत्न केले जात असून यासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

पाचाड या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे याची माहिती आपण घेतली असून, या परिसरातील सातही तलावांचे पुनर्जीवन करुन कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी सांस्कृतिक खात्याचे मंत्री विनोद तावडेही उपस्थित होते. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सहकार्य करण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी ‘रायगड दर्शन’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या शिवराय आणि संभाजी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची घोषणाही करण्यात आली.

रायगड महोत्सव असा असेल

रायगड महोत्सव किल्ले रायगडावर आणि पाचाड येथे दोन ठिकाणी एकाच वेळी हा महोत्सव होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नाट्यरुपांतर करून येणाऱ्या पर्यटकांसमोर सादर केला जाणार आहे.राज्यभरातील ५00 कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यामुळे रायगडावर साक्षात शिवसृष्टी अवतरल्याचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात राज्यातील विविध भागांत बनणाऱ्या २०० वस्तूंचे स्टॉल्स  उपलब्ध करून देण्यात आले आहेत.