हवेतील थंडाव्यामुळे डेंग्यूची साथ कमी होईल, असे महापालिकेकडून सांगितले जात असतानाच केईएममध्ये या आजाराने आणखी एकाचा मृत्यू झाला. शिवराम साहू (१७) असे मृत रुग्णाचे नाव आहे. डेंग्यूने घेतलेला हा तेरावा बळी आहे. शिवरामला ताप येत असल्याने गेल्या आठवडय़ात स्थानिक डॉक्टरांकडे उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे त्याला केईएममध्ये दाखल करण्यात आले. शिवरामला डेंग्यू झाल्याचे तपासात आढळले होते. बुधवारी त्याचा मृत्यू झाला. डेंग्यूविषयी महापौरांनी केलेले वक्तव्य आणि डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला आलेले अपयश यामुळे स्थायी समितीच्या बठकीत विरोधी पक्ष व भाजप सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला, तेव्हा थंडीमुळे डेंग्यूची साथ कमी होण्याची आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. गेल्या वर्षी डेंग्यूमुळे अकराजणांचा मृत्यू झाला होता. मात्र, या वर्षी डेंग्यू बळींची संख्या १३ वर गेली असून त्यातील पाच मृत्यू नोव्हेंबरमधील आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ातही डेंग्यूमुळे आणखी एक मृत्यू झाला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात पालिका रुग्णालयात सुमारे ७०० डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत होते.