scorecardresearch

मुंबईः खोटे सोने तारण ठेऊन १४ खातेदारांकडून बँकेची फसवणूक; एक कोटी ६७ लाखांचा अपहारप्रकरणी एकाला अटक, १४ जणांचा शोध सुरू

गोरेगाव येथे मॉर्डन सहकारी बँकेची एक शाखा असून या बँकेने १२ जुलै ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सोने तारण ठेवणाऱ्या १४ खातेदारांना कर्ज दिले होते.

मुंबईः खोटे सोने तारण ठेऊन १४ खातेदारांकडून बँकेची फसवणूक; एक कोटी ६७ लाखांचा अपहारप्रकरणी एकाला अटक, १४ जणांचा शोध सुरू
बँकेची फसवणूक (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

खोटे सोने तारण ठेऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी नुकतीच एकाला अटक केली. धर्मेद्र बच्चन यादव असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, या गुन्ह्यांत त्याच्यासोबत इतर १४ जण सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. बनावट सोने तारण ठेवून १४ खातेदारांनी कर्ज घेऊन मॉर्डन सहकारी बँकेची एक कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे आतापर्यंत तपासात उघडकीस आले आहे. 

हेही वाचा >>> मुंबई : भर रस्त्यात तरुणीच्या मोबाईलची चोरी; सराईत आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गोरेगाव येथे मॉर्डन सहकारी बँकेची एक शाखा असून या बँकेने १२ जुलै ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सोने तारण ठेवणाऱ्या १४ खातेदारांना कर्ज दिले होते. या खातेदारांनी खोटे दागिने तारण ठेवून बँकेतून एक कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यावेळी एका महिला कर्मचाऱ्याने तारण ठेवलेल्या सोन्याची तपासणी करून मूल्यांकन केले होते. खातेदारांनी खोटे दागिने दिले असताना तिने ते दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन खातेदारांना कर्ज देण्यास बँकेस प्रवृत्त केले होते.

हेही वाचा >>> सैन्यातील मुलांच्या वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली डॉक्टरची फसवणूक; तोतया अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

कर्ज दिल्यानंतर या खातेदारांनी दिलेले कर्ज न भरल्यानंतर बँकेने तारण ठेवलेले दागिने लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू केली. यावेळी या खातेदारांनी दिलेले दागिने खोटे असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बँकेने गोरेगाव पोलीस ठाण्यात १४ खातेदारांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर गोरेगाव पोलिसांनी एका कर्मचाऱ्यासह १५ जणांविरुद्ध  गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी पोलिसांनी धर्मेद्र यादवला शुक्रवारी अटक केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 17:54 IST