विविध खात्यांत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची तब्बल १४,००० पदे रिक्त असतानाही प्रतीक्षायादीवरील उमेदवारांना प्रशासनाने पालिकेचे दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे हे उमेदवार गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसले आहेत. प्रतीक्षायादीच्या विधीग्राह्य़तेचा मुद्दा उपस्थित करून पालिका आपल्या मागणीकडे काणाडोळा करीत असल्याचा आरोप या उमेदवारांनी केला आहे.
मुंबई महापालिकेने २००९ मध्ये कामगारांच्या ३६१६ आणि आयांच्या ३०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. या भरती प्रक्रियेत लाखो अर्ज पालिकेकडे सादर झाले. त्यावेळी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची संख्या प्रचंड होती. यापैकी ३००० पदे २०११ मध्ये, तर ८१६ पदे २०१२ मध्ये भरण्यात आली आणि शंभरपैकी शंभर गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती. त्यापैकी ८१६ आणि ७५२ उमेदवारांना दोन टप्प्यांमध्ये पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले. मात्र या प्रतीक्षायादीची विधीग्राह्य़ता संपुष्टात आल्याचे कारण पुढे करीत उर्वरित उमेदवारांना पालिकेने वाऱ्यावर सोडले आहे.
पालिकेच्या विविध खात्यांमध्ये सध्या तब्बल १४ हजारांहून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या पदांवर प्रतीक्षायादीमधील उमेदवारांची भरती करावी, अशी मागणी हे उमेदवार अनेक महिन्यांपासून करीत आहेत. त्यासाठीच हे उमेदवार २२ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसले आहेत. मात्र अद्याप पालिका प्रशासनाला जाग आलेली नाही.
चतुर्थश्रेणी कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने रिक्त पदांचा आकडा वाढत आहे. ही पदे भरण्यासाठी नव्याने भरती प्रक्रिया करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यासाठी पुन्हा दोन-तीन वर्षांचा कालावधी लागेल आणि सेवानिवृत्तांमुळे आणखी काही पदे रिक्त होतील. अशी वेळकाढू भरती प्रक्रिया करण्याऐवजी २००९ च्या प्रतीक्षायादीतील उमेदवारांना सेवेत घ्यावे, असे या उमेदवरांचे म्हणणे आहे.