बर्फ ही तशी उन्हाळ्यातील जीवनावश्यक वस्तू. आता त्याचे तसे अप्रूप राहिलेले नाही. सहजी, अगदी घरातही उपलब्ध असतो तो आपल्याला. पूर्वी मात्र असे नव्हते. म्हणजे आज हे सांगितले तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही, की तेव्हा बर्फ चक्क आयात होत असते मुंबईत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फार जुनी नाही, साधारणत: दीडशे वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या काळात मुंबईत बर्फ आयात होत असे. तोही परदेशातून. म्हणजे आपल्याकडे एवढा मोठा हिमालय. पण बर्फ आणला जात असे अमेरिका खंडातून. आपल्या ‘मुंबईचे वर्णन’कार गोविंद नारायण माडगांवकर यांनाही ही मोठीच नवलपरी बाब वाटत असल्याचे दिसते. भरभरून लिहिले आहे त्यांनी या विषयावर. ते सांगतात – ‘ह्य़ा शहरांत अमेरिका खंडातून बर्फदेखील प्रतिवर्षी मोठमोठालीं तिर्कटी तारवें भरून येतें.’ आता हे बर्फ म्हणजे काय याचीही त्या काळी अनेक मुंबईकरांना माहिती नसावी असे दिसते. हे म्हणजे विस्मयकारकच; परंतु त्यामुळे माडगांवकर सांगून ठेवतात की, ‘हे थिजलेले पाणी ज्यास बर्फ असे म्हणतात. हे दगडासारखे घट्ट असून ह्य़ाची खंडीखंडी वजनाचीं ढेपें असतात. आणि याचा रंग स्फटिकासारिखा शुभ्र असतो. ह्य़ाचे कुऱ्हाडींनी फोडून तुकडे करितात. ह्य़ास किंचित हवा लागली ह्मणजे तें वितळून त्याचें पाणीं होतें. हे बर्फ आठ दहा रत्तल या भावाने विकतात. हे फार थंड आहे.’

बर्फ पांढरे शुभ्र असते. ते थंड असते, हे पुस्तकात वाचणे ही मौजच!

या बर्फाचा मुंबईत खपही चांगला असे. रोज किमानपक्षी (त्या काळच्या) हजार, दोन हजार रुपयांचे बर्फ खपत असे! हे बर्फ आणून वखारींमध्ये ठेवले जाई. हवा लागून त्याचे पाणी होत असल्याने ‘ते मोठय़ा जतनेनें ठेवावें पडतें’, असे सांगून माडगांवकर लिहितात – ‘ज्या वखारींत बर्फ ठेवितात तीस शिशाचे पत्रे मारलेले असतात व हवा आंत जाऊं नये ह्मणून जिकडे तिकडे फार बंदोबस्त केलेला असतो.’ बर्फाची गिऱ्हाईके असत ती खासकरून इंग्रज, पोर्तुगीज, पारशी आणि मुसलमान. हिंदूसुद्धा क्वचित आणत. त्यांच्याकरिता माडगावकरांनी खास ‘टीप’ दिली आहे. ते सांगतात – ‘बर्फ घरीं आणिलें तर बुर्णुसांत किंवा ऊर्णावस्त्रांत गुंडाळून ठेविले पाहिजे. नाही तर त्याचें लागलेंच पाणी होतें.’

हे सर्व सांगून झाल्यानंतर ते जरा वेगळ्याच विषयाला हात घालतात. सांगतात – ‘पाहा – इंग्रज लोक परखंडातील पाणीदेखील आणून त्यापासून द्रव्य उत्पन्न करितात. असे त्यांचे उद्योग अनुपमेय आहेत.’

एतद्देशीयांनी इंग्रजांप्रमाणे उद्योगी, शिक्षित बनावे ही अपेक्षा पुस्तकात जागजागी दिसते. ती कौतुकास्पदच.

माहीतगार

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 150 year ago ice imported all the way from america to mumbai
First published on: 22-04-2017 at 02:14 IST