मुंबईत ‘टाटा’ कंपनीचे विजेचे दर तुलनेत कमी असल्याने ‘रिलायन्स’च्या ग्राहकांनी ‘टाटा’कडे हस्तांतरित व्हावे, असा सल्ला देतानाच गेल्या वर्षभरात सुमारे १५ हजार ग्राहकांनी ‘रिलायन्स’ला टाटा केल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी सांगितले. तसेच मुंबईतील वीज दर समान असावेत हा सरकारचा प्रयत्न असला तरी दर कमी करण्याकरिता सरकार अनुदान देणार नाही, असे स्पष्ट केल्याने राज्याच्या अन्य भागाप्रमाणेच मुंबईतील दर कमी होणार नाहीत हेच सूचित केले.
राज्यातील विजेचे दर २० टक्के कमी करण्यात आल्याने मुंबईतीलही वीज दरात कपात करावी म्हणून सत्ताधारी काँग्रेसचाच मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे. मुंबईतील वीज दर कमी करण्याकरिता टाटा, रिलायन्स आणि बेस्टच्या अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मुंबईतील तिन्ही कंपन्यांच्या दरात तफावत आहे. या दरात समानता असावी यावर सरकारचा भर आहे. हे कसे करता येईल याबाबत कंपन्यांनाच मार्ग काढण्याची सूचना करण्यात आली आहे. मुंबईतील वीज दर कमी करण्यासाठी सरकारला तिन्ही कंपन्यांना अनुदान द्यावे लागेल. मात्र सरकार असे अनुदान देणार नाही, असे मुख्यमंत्री चव्हाण तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरवाढीवर मार्ग काढण्याकरिता ‘रिलायन्स’च्या ग्राहकांनी ‘टाटा’चे ग्राहक म्हणून हस्तांतरित व्हावे, असाच सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.