मंगळवारच्या पावसात लोकलमध्ये तब्बल १६ तास काढलेले ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी यांचा अनुभव..

मंगळवारी सकाळपासूनच पावसाने मुक्त बरसायला सुरुवात केली होती. तशात सकाळी अकरा वाजता ठाणे स्थानक गाठले. फलाटांवरील सारेच इंडिकेटर निस्तेज झाले होते. पण साडेअकरा वाजता चार क्रमांकाच्या फलाटावर सीएसटीला जाणारी लोकल आली. तरीही त्यात घुसलो. मनात हुश्श केलं खरं, पण कुल्र्यापर्यंत वेगात आलेली लोकल अचानक धापा टाकू लागली. कसेबसे तिने शीव रेल्वे स्थानक गाठले. पावसाचा जोर वाढू लागला, पाण्याखाली रुळ गेले. लोकलची गती मंदावली. काही मिनिटे आचके खात कशी तरी पुढे सरकली. पण माटुंगा स्थानक यायच्या आधीच काही अंतरावर तिची धडपड संपली. ती वेळ साधारणत  दुपारी साडे बाराची असेल. गाडीत अनेक प्रवाशी होते. पण तरीही सन्नाटा पसरला होता.  आभाळ काळेकुट्ट. थोडा आंधारही आच्छादला. अर्धा तास झाला, एक तास, दोन तास, लोकल निपचितच पडलेली. रुळावरचे पाणी आणखी वाढू लागले. पुढे माटुंगा फलाटावर एक गाडी थांबलेली. प्रवाशांना अंदाज आला. पुडच्या लोकलने जागा सोडल्याशिवाय ही लोकल हालणार नाही. चहुबाजुने गुढगाभर पाणी साचले होते. त्याची परवा करतील तर ते लोकलप्रवाशी कसले? प्रसंग युदधासारखाच वाटला. मग तरण्या पोरांच्या पहिल्या फळीने पाण्यातच उडय़ा मारुन कशीबशी माटुंगा स्थानकाच्या दिशेने कूच करायला सुरुवात होती. बाकीचे आहे, तिथेच बसून राहिले. जागा नव्हती ते उभे होते. कुणी तरी लोकलच्या या नेहमीच्या गोंधळाला उद्देशून एक सौम्य शिवी हासडली.

त्याला एकाने उग्र शिवीने अनुमोदन दिले. त्यांच्याच जथ्यातला मग एक जण मलिष्का स्टाईलने गुणगुणला, तुमचा लोकलवर  भरवसा नाय काय ? त्यावर हशा. पुन्हा चेहरा भरुन प्रश्नचिन्ह. गाडी कधी सुटणार, सुटणार की नाही सुटणार ?

सायंकाळचे सहा वाजत आले. अंधार आणखी गडद होऊ लागला. पावसाचे थैमान सुरुच होते. कामावरुन परतीची वेळ झाली तरी, गाडी जागची हालत नव्हती. टॅक्सी-रिक्षा करुन घरी जाण्यासाठी लोकलमधून बाहेर पडणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. लोक पाण्यात उडय़ा मारत होते. खाली पडत होते. पडत-धडपडत बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत होते.

महिला व वृदधांच्या हालाला तर पारावर राहिला नाही. पाण्यातून कशीबशी वाट काढत लोक माटुंगा स्थानकाकडे निघाले. काहींनी बाजुला उभ्या असलेल्या लातूर-मुंबई पॅसेंजरचा आसरा घेतला. तिथे बाथरुमची व्यवस्था असल्याने पाच-सहा तासांपासून अडलेल्या प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. साधारणत रात्रीचे नऊ वाजले असतील. खाण्यापिण्याचे हाल सुरु झाले. कुणी तरी समाजसेवक बिस्किटांचे पुडे आणून देत होते. परंतु तेही खचाखच भरलेल्या गाडीत लगेच संपून जायचे. गाडी ठप्पच. गोंधळ सुरु झाला. मोटरमनला जाब विचारायला चारजण गेले. परत आले. शिव्या देतच. एकाने मोलाचा सल्ला दिला. मोटरमनला काही बोलू नका, नाही तर ते संप करतील मग आपले काही खरे नाही. निघणारी गाडी अडवून ठेवतील.  इथे उद्वेग-उद्रेक काही चालत नाही. मग बहुतेकांनी त्याला आवाजी मतदानाने पाठिंबा दिला आणि ते चार वीरही बसल्या जागी गुडघ्यात माना खुपसून शांत झाले.

पावणे एक वाजले. गाडीचा हॉर्न वाजला. प्रवाशांनी आनंदाने आरोळ्या ठोकल्या. एक हिसका बसला. गाडी सुरु झाली. कासव गतीने लोकलने अर्ध्या तासाने शीव स्थानक गाठले. पण पुढे पंधरा-वीस मिनिटे झाली तरी, गाडी जागची हालेना. तास झाला, चार तास झाले. काहीच हालचाल नाही. पुन्हा रेल्वेच्या नावाने शिव्या देत लोक फलाटावर उतरले. तेवढय़ात हॉर्न वाजला.

आपापल्या जागा पकडण्यासाठी पुन्हा पळापळ. पण गाडी ढिम्मच. अखेर १६-१७ तासांपासून लोकल पुढे जाण्याची वाट पहात बसलेले प्रवासी सरळ स्थानकाबाहेर पडले. मग रिक्षा, टॅक्सी, बस थांबविण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरु झाली. तीही शांतता आणि संयमानेच. ही सहनशिलता येते कुठून, लाख हाल झाले तरी, मनात धुमसणारा उद्रेक विझतो कसा, काहीच कळत नाही.