एकाच दिवशी १९ मोबाइलची चोरी
मुंबई : उपनगरीय रेल्वे हद्दीत सामान्य प्रवाशांना प्रवासाला बंदी असतानाच चोरांचा मात्र बिनदिक्कतपणे शिरकाव होत आहे. जुलै महिन्यात मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील प्रवाशांचे मोबाइल चोरीला जात असून १६३ हून अधिक मोबाइल लंपास केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनामुळे मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय प्रवासावर निर्बंध आले. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्यांना प्रवासाची परवानगी नाही. परंतु काही प्रवासी विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही प्रवासी अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचा बनावट पास बाळगून प्रवास करतात. परंतु अशा प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. अशी परिस्थिती असतानाच चोर मात्र फलाट आणि लोकलमध्ये बिनदिक्कतपणे शिरकाव करीत असल्याचे समोर आले आहे. पाकीट चोरीपेक्षा महागड्या मोबाइलवरच डल्ला मारला जात आहे. जुलै २०२१ मध्ये १६३ हून अधिक मोबाइल चोरीची नोंद झाली आहे. प्रत्येक दिवशी चारपेक्षाही अधिक मोबाइल चोरीची प्रकरणे दाखल होत आहेत. २७ जुलैला तर तब्बल १९

मोबाइल चोरीची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. यात सर्वाधिक  दादर लोहमार्ग पोलीस हद्दीत  चार, वडाळा लोहमार्ग पोलीस  हद्दीत तीन असून वसई, ठाणे  लोहमार्ग हद्दीतही घटना घडल्या आहेत. महिन्याभरात सर्वाधिक चोरीची नोंद मध्य रेल्वेवरील कल्याण लोहमार्ग पोलीस हद्दीत होत आहे. या हद्दीत दर दिवशी सरासरी तीन ते चार मोबाइल चोरीला जात आहेत. चर्चगेट, अंधेरी, बोरिवली, वाशी लोहमार्ग पोलीस हद्दीतही सर्वाधिक चोऱ्या होतात.

सध्या रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांवर रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त नसतो. त्यामुळे  विनातिकीट स्थानकात चोर प्रवेश मिळवतात. शिवाय रुळांजवळील वस्त्या आणि तेथील

अनधिकृत मार्गातूनही प्रवेश करून स्थानकातील फलाटापर्यंत येतात. तर रुळांजवळील खांब, झुडुपात लपून बसलेले चोर धावत्या लोकलच्या डब्यातील दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावरही काठीने प्रहार करून वस्तू लांबवत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 163 mobile theft stolen by thieves in a month akp
First published on: 29-07-2021 at 00:37 IST